मुंबई, दि. ९ : मुंबई मराठी पत्रकार संघाने २०१० साली संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने संयुक्त महाराष्ट्र लढ्यात पत्रकारिता केलेल्या ३४ ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून प्रत्येकी ११,१११/- सन्मान निधी बहाल केला होता. आता देखील ६५ वर्षांवरील आपल्या सदस्यांना पत्रकार संघातर्फे १२०० रुपयांची पेन्शन दरमहा दिली जाते. पत्रकार संघाचा आर्थिक कारभार उत्तम चालत असल्यामुळेच हे घडू शकते. म्हणूनच पत्रकार संघाचे कार्य चोख आणि प्रशंसनीय आहे असे मला वाटते, असे गौरवोद्गार जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी शुक्रवारी काढले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रांगणातील सारस्वत बँकेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी जागतिक किर्तिचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी छायाचित्रात डाविकडून संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, विश्वस्त राही भिडे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड व इतर मान्यवर दिसत आहेत.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रांगणातील सारस्वत बँकेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत बँकेचे चेअरमन श्री. गौतम ठाकूर तर अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे उपस्थित होते
एटीएम विषयी बोलताना डॉ. नरेंद्र जाधव पुढे म्हणाले की, ‘एटीएम जेव्हा नव्याने आले तेव्हा त्याचे अप्रूप वाटत होते. एटीएम केंद्राच्या उद्घाटनाला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना बोलावले जात असे. त्यावेळी मी रिझर्व्ह बँकेत होतो. महिन्यातून किमान १० वेळा अशा उद्घाटनाचे आमंत्रण गव्हर्नरना येत असे. त्यावेळी त्यांचे भाषण लिहून देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा प्रत्येकवेळी एटीएम या विषयावर वेगळे भाषण काय लिहून द्यायचे असा प्रश्न मला पडत असे’, असेही डॉ. जाधव यांनी हास्यकल्लोळात सांगितले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. गौतम ठाकूर म्हणाले की, ‘सारस्वत बँक सदैव सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून काम करत आली आहे. याच भावनेतून आम्ही टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी मोठ्या रकमेचे अर्थसहाय्य दिले. पण आमच्या नावाची पाटी कुठेही लावू नका असे त्यांना आवर्जुन सांगितले. तीच सूचना आम्ही पत्रकार संघाला देखील केली.’
प्रारंभी कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष श्री. वाबळे यांनी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात श्री. वाबळे म्हणाले की, दि. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात सारस्वत बँकेने रु. ७५००० कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे. तो देखील शुन्य टक्के एनपीए ठेऊन. बँकेचे हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. अनेक बँका केवळ मुठभर लोकांना मोठी कर्जे दिली म्हणून बुडत असतांना सारस्वत बँकेने मात्र वेगळा आदर्श घालून दिला आहे. बँकांच्या आर्थिक घोटाळ्यात बँकेच्या पदाधिकार्यांना, अधिकार्यांना आणि संबंधित कर्जदारांना देखील अटक केली जाते. पण बँकेच्या ऑडीट करणार्या रिझर्व्ह बँकेच्या संबंधित अधिकार्यांवर ठपका ठेवून त्यांना का अटक केली जात नाही? असा सवाल श्री. वाबळे यांनी केला.
संघाचे कोषाध्यक्ष श्री. जगदीश भोवड यांनी आभार मानले तर कार्यकारिणी सदस्य श्री. आत्माराम नाटेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. किशोर रांगणेकर व अधिकारी सर्वश्री मंगेश नाडकर्णी आणि समीर राऊत यांचाही या प्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा