अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलावांची सुविधा लवकरच होणार सुरू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, ४ मार्च, २०२४

अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलावांची सुविधा लवकरच होणार सुरू

  • 'प्रथम येणाऱयास प्रथम प्रवेश' या तत्वावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया दिनांक ६ मार्च २०२४ पासून होणार सुरू
  • शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना शुल्कामध्ये सवलत; तर महिलांसाठी विशेष बॅच

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलावांसाठी बुधवार, दिनांक ६ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे. प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही नोंदणी होणार आहे.


मुंबईकर नागरिकांना पोहणे या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तरण तलावांची सुविधा देण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार व मान्यतेनुसार जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ, कोंडिविटा, अंधेरी (पूर्व), वरळी हिल जलाशय परिसर, वरळी आणि राजर्षि शाहू महाराज उद्यानाजवळ, टागोर नगर, विक्रोळी या तीन परिसरातील तरण तलावांसाठी नव्याने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांनी दिली आहे. या तरण तलावासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही प्रवेश प्रक्रिया "प्रथम येणाऱयास, प्रथम प्राधान्य" या पद्धतीने सुरू आहे.

 

सभासदत्व घेणाऱया सभासदांना तरण तलावाचे नियम व सुरक्षा संबंधी सर्व नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची व वैद्यकीय प्रमाणपत्रांची पूर्तता केल्यानंतरच सदर सभासदत्व अंतिम होणार आहे, याची सर्व संबंधितांनी आवर्जून नोंद घ्यावी.

 

वरील तीनही तरण तलावांत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ८ हजार ८३६ इतके वार्षिक सभासदत्व शुल्क आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक, बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवक यांना शुल्कात सूट देत रुपये ४ हजार ५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. पुरुषांसाठी या तीनही तरण तलावात पोहण्याची वेळ सकाळी ६ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० अशी असेल.

 

तसेच या तीनही तरण तलावात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत महिलांसाठी विशेष बॅच असेल. या बॅचला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये ६ हजार ७१६ इतके आहे. तसेच शालेय विद्यार्थिनी, ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला, बृहन्मुंबई महानगरपालिका महिला कर्मचारी, निवृत्त महानगरपालिका महिला कर्मचारी आणि महिला नगरसेवक यांनादेखील रुपये ४ हजार ५८६ इतके वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे, असे जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक श्री संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे.

 

सभासदांसाठी महत्त्वाचे नियम व अटी-

ऑनलाईन पद्धतीने सभासदत्व घेतलेल्या सभासदांनी त्याच्या प्रवर्गानुरूप खालील नमूद कागदपत्रे कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी (वय १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत अथवा इयत्ता दहावीपर्यंत) / वरिष्ठ नागरिक (वय ६० वर्षांवरील) प्रवर्गातील सभासदांना जन्मतारखेचा पुरावा सादर करावा लागणार आहे. तसेच महानगरपालिका कर्मचारी, नगरसेवकांना महानगरपालिकेचे ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. दिव्यांग नागरिकांनादेखील ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याबाबतचे शासनमान्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याशिवाय वय वर्षे तीन (दोन वर्षे पूर्ण) ते सहा वर्षे दरम्यानच्या सभासदांसमवेत त्या सभासदाची जबाबदारी घेणारे पालक किंवा पालकांनी नियुक्त केलेली व्यक्ती (जिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही) तरण तलावाची सभासद असणे आवश्यक आहे. हे सभासद पोहत असताना जबाबदारी घेतलेल्या सभासदाने त्याच्या समवेत तरण तलावात उपस्थित राहणे (पाण्यात उतरणे) बंधनकारक आहे. जबाबदारी घेणाऱया सभासदाव्यतिरिक्त तरण तलावाची सुविधा उपभोगणारा सभासद आढळल्यास त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात येतील, याची नोंद घ्यावी. वय वर्षे सात (सहा वर्षे पूर्ण) ते अठरा दरम्यान असणाऱया सभासदांसाठी पालकाने विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.


(जसंवि/६७१) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज