अचानक हात सटकला अन...
मुंबई, दि. २४ : लोकल रेल्वेच्या मोटर कोचच्या डब्याला लटकून निष्काळजीपणे प्रवास करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही तरुण लोकलच्या मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होते.
व्हिडीओ पहा...👇
याच दरम्यान त्यातील एका तरुणाचा हात निसटला आणि तो तरुण दोन रेल्वे ट्रॅकमधील गॅपमध्ये पडला. सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र, त्याच्या हाताला आणि पायाला जखम झाली आहे. दानिश जाकीर हुसेन खान (वय १८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हि घटना बाजूच्या लोकलमधील एका व्यक्तीने मोबाईल मध्ये शूट केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दानिश खान हा कळवा येथील रहिवाशी असून तो मुंबईत पीओपीसारखे मजुरीचे काम करतो. नेहमीप्रमाणे २३ जून रोजी सकाळी ९ वाजता तो दादर येथे आपल्या कामावर गेला होता. सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे दानिश त्याचा आतेभाऊ आणि काही नातेवाईक तरुणांसह मोटर कोचच्या डब्याला लटकून प्रवास करत होते. यावेळी अचानक त्याचा हात सटकला आणि धावत्या लोकलमधून तो खाली पडला. सुदैवाने तो दोन ट्रॅकच्या मधल्या गॅपमध्ये पडल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे EPR नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ता. क. : फुटबोर्डवर उभे राहून स्टंट करीत प्रवास करू नये. यामुळे आपल्या जीवाला धोका संभवतो. जीव अनमोल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा