१८ महिन्यांचा वाढीव कार्यकाळ
मुंबई, दि. २७ : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना राज्य शासनाने मुदतवाढ देत ३ जानेवारी २०२६ पर्यंत या पदावर कायम ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातील न्यायनिर्णय व आदेश यांच्या आधारे शासनाने मंगळवारी याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाने अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिलेल्या रश्मी शुक्ला यांना १८ महिन्यांचा वाढीव कार्यकाळ मिळणार आहे.
फोन टॅपिंगच्या आरोपातून मुक्त झालेल्या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक व महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश गृहखात्याने ४ जानेवारीला जारी केले होते. त्या राज्य पोलीस दलातील ४८ व्या आणि पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत.
शुक्ला या येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना या पदावर सहा महिन्यांचा कालावधी मिळत होता. त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावर दोन वर्षांच्या कार्यकाळ देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक होते. त्यानुसार त्यांना ३ जानेवारी २०२६ पर्यंत या पदावर ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा