यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी मिळून ४८१ पंपांद्वारे सखल भागातील पाणी उपसा करणार - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ६ मार्च, २०२४

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी मिळून ४८१ पंपांद्वारे सखल भागातील पाणी उपसा करणार

मुंबई, दि. ५ : जोरदार पावसाच्या काळात सखल भागातील पाणी साचण्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महानगरपालिकेच्‍या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मुंबई शहर तसेच उपनगरांमधील विविध ठिकाणी पाणी उपसा करणारे एकूण ४८१ पंप बसविण्याचे नियोजन केले आहे. त्‍यामुळे सखल भागातील परिसरात राहणा-या नागरिकांना आणि या ठिकाणांहून प्रवास करणा-या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

 

जोरदार पावसाने सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने वेळीच कार्यवाही करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिले आहेत. त्यानुसार, मुंबईकर नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने पाणी साचणा-या विविध सखल ठिकाणी मिळून ४८१ पंप बसविण्‍याचे नियोजन पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केले आहे.


मुंबईत जेव्हा ताशी ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडतो तसेच समुद्राला या काळात भरती असली तर अशावेळी सखल भागात पाणी साचते. मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी साचण्‍याची ठिकाणे शोधण्‍याची कार्यवाही विभाग पातळीवरील कर्मचारी आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, सूंपर्ण मुंबईचा विचार करता विविध ठिकाणी ४८१ पाणी उपसा करणारे पंप बसविण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. शहर भागात १८७, पश्चिम उपनगरांमध्ये १६६ आणि पूर्व उपनगरांमध्ये १२४ पंप बसविण्‍यात येणार आहेत. हे पंम्प उच्‍च कार्यक्षमतेचे आणि आपत्‍कालीन परिस्थितीत सदैव कार्यरत असतील.  

 

या पंपांच्या ठिकाणी ऑपरेटर आणि मदतनीस असे मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. गरजेनुसार पंप वेळेत सुरू होतील आणि योग्य पद्धतीने कार्यरत राहतील याची जबाबदारी विभागीय पातळीवर सोपविण्‍यात येणार आहे. विभागातील सहायक अभियंते अर्थात समन्वय अधिकारी हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील समन्वयकाकडे या पंपच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. त्यामुळे जोरदार पावसावेळी पंपांनी किती तास पाणी उपसा केला यावर लक्ष ठेवणे देखील शक्य होणार आहे.

 

सन २०२२ मध्‍ये ३८० पंप बसविण्याचे निश्चित करण्‍यात आले होते. मात्र, विभागांच्‍या मागणीनुसार ५५ अतिरिक्त म्‍हणजेच एकूण ४३५ पंप बसविण्‍यात आले होते. तर, सन २०२३ मध्‍येदेखील पाणी उपसा करणारे ३८० पंप बसविण्‍याचे नियोजन करण्‍यात आले होते. वाढीव मागणीनंतर ११२ अतिरिक्त पंपांसह एकूण ४९२ पंप कार्यान्वित होते. यंदा म्‍हणजेच सन २०२४ मध्‍ये २५ प्रशासकीय विभाग आणि राजे एडवर्ड स्‍मारक (केईएम) रुग्णालय, लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालाच्‍या मागणीनुसार विविध ठिकाणांवर ४८१ पंप बसविण्‍याचे नियोजन पर्जन्‍य जलवाहिन्या विभागाने केले आहे.

 

पर्जन्य जलविभागाने यंदाच्‍या वर्षात केलेली वाहिनी स्‍वच्‍छता, अंथरलेल्‍या नवीन पर्जन्य जलवाहिन्‍या, खराब झालेल्‍या वाहिन्यांचे मजबूतीकरण यामुळे काही सखल परिसरांत ठिकाणी पाणी साचण्‍याच्‍या घटनांमध्‍ये घट झाली आहे. तर, पावसाळ्यातील परिस्थितीनुसार पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांमध्‍ये वाढही होऊ शकते, या दृष्‍टीने महानगरपालिकेने नियोजन केले आहे.     


(जसंवि/६७३) 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज