मुंबई, (दादासाहेब येंधे ) : दक्षिण मुंबईत नागपाडा परिसरात दिवसा ढवळ्या पडलेल्या अडीच कोटींचा दरोड्याचा गुन्हा मुंबई पोलिसांनी अवघ्या १२ तासात उघडकीस आणला आहे. मुंबईतील विविध ठिकाणाहून ५ जणांना अटक करण्यात आली असून दरोड्यात चोरीला गेलेले २ कोटींचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

आरोपींनी दीड किलो वजनाचे लगड व दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला होता. आरोपींकडून सर्व म्हणजे २ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
विनायक अजय दळवी, शहनवाज हुसैन खान, मंगेश पंढरीनाथ शिंदे, अब्दुल हकीम अब्दुल कादीर शेख व संतोष जैन अशी अटक आरोपींची नावे असून यातील विनायक हा कुर्ला, शहनवाज हा शिवडी, मंगेश हा कुर्ला, अब्दुल हा नागपाड्यातील रहिवासी आहे. आरोपीनी झटपट श्रीमंत होण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी हा साहसी दरोडा घातला होता. त्यातील संतोष जैन हा यापूर्वी चोरी झालेल्या जवेलर्स मध्ये कामाला होता. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपाड्यातील डायना पुलावर ही घडली. त्यात जवेलर्स मध्ये काम करणारे दोन कर्मचारी लोअर परळ येथील दागिने निर्मिती करणाऱ्या युनिटमध्ये सोने घेऊन जात होते. आरोपी बऱ्याच काळापासून त्याचा पाठलाग करत होते. डायना पुलावर पोहचताच आरोपींनी त्यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी उभी केली. त्यांना अडवल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने उतरून कर्मचाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावली. त्याच्या मदतीसाठी आणखी एका दुचाकीवरून आले होते. त्यानंतर त्यांनी दुचाकीची चावीही काढून घेतली. त्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांना आरोपींचा पाठलाग करता आला नाही परिणामी, घटनास्थळावरून पळून जाण्यास आरोपी यशस्वी झाले होते.
जवेलर्स मधील कर्मचाऱ्यांनी नागपाडा पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे व गुुन्हे शाखेच्या पथकांनी मुंबई सर्वत्र नाकाबंदी करून दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गुन्हे शाखेकडूनही प्रकरणी समांतर तपास करण्यात आला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींना कर्मचाऱ्यांच्या मार्गाची माहिती होती. त्यामुळे परिचीत व्यक्तीचे हे काम असावे, असा संशय होता. तसेच आरोपी अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलीसांनी घटनास्थळ आणि मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा