५०० मीटर परिसर मोकळा, एच पूर्व विभागाच्या वतीने धडक कारवाई
मुंबई, दि. २ : मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या ६७२ झोपड्या तसेच अन्य अनधिकृत बांधकामे निष्काषित करण्याची धडक कारवाई दिनांक २९ फेब्रुवारी आणि दिनांक ०१ मार्च २०२४ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एच पूर्व' विभागाच्या वतीने करण्यात आली. या कार्यवाहीमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला असून नदीपात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटरवर नेण्यास मदत होणार आहे.
मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाह योग्य करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी काम करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये बक्षी सिंग कंपाऊंड येथील १०० मीटरचा परिसर मोकळा करून पर्जन्य जलवाहिनी विभागास हस्तांतरित करण्यात आला. सद्यस्थितीत त्या ठिकाणी सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
याच धर्तीवर मिठी नदीच्या पात्रात किंवा पात्रालगत अनधिकृतपणे झालेली बांधकामे निष्कासित करण्यासाठी एच पूर्व विभागाच्या वतीने दिनांक २९ फेब्रुवारी आणि दिनांक ०१ मार्च २०२४ दरम्यान धडक मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत ६७२ झोपड्या तसेच अन्य बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे ५०० मीटर भाग मोकळा झाला. आता या संपूर्ण परिसरामध्ये मिठी नदीपात्राचे रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्त्याचे बांधकाम करणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे करण्यात येणार आहे. या मुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी ४० मीटरवरून १०० मीटर होईल. तसेच मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून अन्यत्र वळविल्यामुळे नदीमध्ये होणाऱया प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल.
(जसंवि/६६७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा