घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते शुभारंभ


जागतिक दृष्टी दिनानिमित्त घन कचरा व्यवस्थापन खात्याचा उपक्रम


मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा या सुव्यवस्थित प्रकारे मिळाव्यात, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामगार – कर्मचारी – अधिकारी अव्याहतपणे कार्यरत असतात. तर मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार दिवसरात्र पद्धतीने नियमितपणे कार्यरत असतात. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणारी बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या कर्मचा-यांच्या आरोग्याचीही काळजी सजगपणे सातत्याने घेत असते. याच भूमिकेतून व दिनांक १३ ऑक्टोबर रोजीच्या जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या पुढाकाराने आणि ‘मिशन फॉर व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने कामगारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराचा औपचारिक शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते आज झाला. 




बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज झालेल्या या कार्यक्रमाला उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) श्री. भारत तोरणे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन - प्रकल्प) श्री. मिनेश पिंपळे, ‘मिशन फॉर व्हिजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती एलिझाबेथ कुरियन, श्री. श्रीकांत अय्यंगार, केबीएचबी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर व श्री. अशोक गायकवाड आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेले नेत्र तपासणी शिबिर हे आज दि. १० ऑक्टोबर पासून दि. १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत एफ दक्षिण विभागातील व परळ परिसरातील भातनकर महानगरपालिका शाळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी १० ते दुपारी १.३० या कालावधी दरम्यान कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरातील तपासणीनंतर आवश्यक ते औषधोपचार, चष्मे इत्यादी बाबीदेखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे.       



 जसंवि/२७७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज