मुंबई, दि. ३१ : एका सराईत गुन्हेगाराला पूर्व उपनगरातून अटक करण्यास मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. शिवा आरमोगन शेट्टी असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत घरफोडी, जबरी चोरी आणि पोलिसांवर हल्ला करणे यासारखे जवळपास दोन डझनपेक्षा जास्त गंभीर गुन्ह्याची नोंद त्याच्या नावावर आहे.

काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवा याने आपल्या इतर चार साथीदारांसह नवी मुंबईतील खारघर येथे एकाच दिवशी तीन घरफोडीचे गुन्हे केले होते. गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पथकाने अटक केलेल्या शिवाचा ताबा खारघर पोलिसांकडे सोपवला आहे.
कांजूरमार्ग पूर्व येथील कर्वे नगरात राहणारा शिवा आरमोगम शेट्टी (वय, २९) या सराईत गुन्हेगावर कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२२ मध्ये झालेल्या एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. शिवा याला कांजूरमार्ग येथे एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात शिवा शेट्टी विरोधात दरोडा, हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शस्त्र बाळगणे या कलमांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच त्याला मकोका कायदा लावण्यात आला होता. या गुन्ह्यात शिवा शेट्टी हा १ जानेवारी २०२५ रोजी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.
शिवा शेट्टी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०१२ पासून २०२२पर्यत जवळपास दोन डझन गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे शिवा हा जामिनावर बाहेर पडताच मुंबई गुन्हे शाखा कक्ष-७ चे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून होते. कक्ष-७ कडून शिवाच्या घरी जाऊन वारंवार चौकशी केली जात होती. मात्र मागील काही दिवसापासून शिवा शेट्टी हा आढळून येत नसल्यामुळे गुन्हे शाखा कक्ष-७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी पोलीस पथकाला शिवा शेट्टीच्या मागावर पाठवले. शिवा शेट्टी याने गुन्हे करण्यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि पालघर ही क्षेत्रे निवडली होती, व त्या ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी सारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती कक्ष-७ च्या पथकाला मिळाली होती तसेच शिवा शेट्टी हा ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे आपल्या परिवारासोबत ओळख लपवून राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कक्ष-७ च्या पथकाने गुरुवारी कळवा येथे सापळा रचुन शिवा शेट्टीला ताब्यात घेतले. शिवा पोलिसांवर हल्ला करणार त्यापूर्वीच कक्ष-७ च्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जामिनावर बाहेर आल्यानंतर खारघर, पालघर आणि ठाण्यात घरफोड्या केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवा शेट्टीचा ताबा खारघर पोलिसांकडे दिला. खारघर पोलिसांनी शिवाला तीन घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे अशी माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी दिली.
कक्ष ७ च्या पथकाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७ चे प्र.पो.नि.आत्माजी सावंत, म.पो.नि. राजश्री बाळगी, स.पो.नि. धनाजी साठे, पो.उ.नि. स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, स. फौ. दिपक पवार, गुख, पो. हवा. सुभाष मोरे,अजय बल्लाळ, विनोद शिरापुरी, सचिन गलांडे, विलास राऊत, हर्षल पाटील, प्रमोद शिंदे, विकास होनमाने, महेश सावंत, आणि जितेंद्र पाटील या पथकाने शिवा शेट्टी याचा माग काढून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा