मुंबईतील १० टक्के पाणी कपात सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

मुंबईतील १० टक्के पाणी कपात सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे

मुंबई, दि. २६ : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया सातही जलाशयात जुलै २०२४ मध्ये दमदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्‍याने पाणीसाठ्यामध्ये सातत्‍याने वाढ होत आहे. दिनांक १ जुलै ते २५ जुलै २०२४ या कालावधीत पाणीसाठ्यात सुमारे ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती जुलै महिन्‍याच्‍या अखेरच्‍या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यात सध्‍या लागू असलेली १० टक्के पाणी कपात सोमवार, दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्‍यात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्‍या प्रारंभापर्यंत मुंबईस पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात पाणीसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्‍के तर दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यात देखील ही कपात नियत दिनांकापासून लागू करण्‍यात आली होती.


मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला वार्षिक पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. 


सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी होत असून पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण भरून वाहू लागले आहेत. पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक स्थितीत पोहोचल्यामुळे आता १० टक्के पाणी कपात सोमवार, दिनांक २९ जुलै २०२४ पासून रद्द करण्यात येत आहे. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.


पाणी कपात रद्द केल्‍याने टोकाच्‍या (टेल एंड) वस्‍त्‍या, गृहनिर्माण संस्‍था आदी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्‍यास मदत होईल. तसेच, संपूर्ण महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल. 


तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत असला आणि पाणी कपात मागे घेण्यात येत असली तरी नियमित सवयीचा भाग म्हणून नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे विनम्र आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

(जसंवि/२६५)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज