वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला खास सहलीचे नियोजन करा
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाला निर्देश
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात वन्यजीव सप्ताह
मुंबईसारख्या महानगरात मुलांचा निसर्गाशी संबंध येणे खूप गरजेचे आहे. निसर्ग, पर्यावरण, पर्यावरणातील घटक त्यांना जवळून पाहता यावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घ्यायला हवेत. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसच्या माध्यमातून दर शनिवारी आणि रविवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे न्यायला हवे, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाला दिले आहेत.
वन्यजीव सप्ताह २०२३ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आज (दिनांक ४ ऑक्टोबर २०२३) सकाळी मुख्य समारंभ पार पडला. यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते.
तत्पूर्वी आज सकाळी उद्यानातील बँडस्टँड येथे पार पडलेल्या चित्र रंगवा स्पर्धेत कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनीदेखील भेट दिली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
स्थानिक आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, ‘एलिफंट मॅन’ तथा पद्मश्री डॉ. के. के. सरमा, सह आयुक्त (शिक्षण) श्री. गंगाथरण डी., शिक्षण उपसंचालक श्री. संदीप संगवे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, श्रीमती सोनल केसरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताह समारोहात मार्गदर्शन करताना श्री. केसरकर कार्यक्रमात म्हणाले, प्राणी आणि मनुष्य यांच्यात एक नातं असते. वाढत्या शहरीकरणात आपण हे नाते टिकवायला हवे. त्यात उद्याने, बगीचे यांचा मोठा वाटा आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या पुनर्वसनात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा मोठा वाटा आहे. या उद्यानातील प्राणी-पक्षी नीट पाहता यावेत म्हणून लवकरच येथे डबल डेकर बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ज्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी झटत असते त्याचप्रमाणे काही सामाजिक संघटना, एनजीओदेखील कार्यरत आहेत. ‘मुंबई फर्स्ट’ सारखी एनजीओ टेरेस गार्डन या संकल्पनेवर मोठे काम करीत असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'स्वच्छता मॉनिटर' या उपक्रमाचेही कौतुक केले.
डॉ. के. के. सरमा यांनी मनोगत व्यक्त करतांना पर्यावरणाचा मानवी जीवनाशी असलेला संबंध उलगडून दाखविला. शंभर वर्षांपूर्वी माणूस जंगलात जाण्यास घाबरत होता. मात्र हल्ली माणसांचा जंगलात इतका हस्तक्षेप वाढला आहे, की त्यामुळे प्राणीच जंगलात घाबरत आहेत. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. याला माणसांची वाढती लोकसंख्या व जंगलात केलेले अतिक्रमण जबाबदार आहे. यावर वेळीच ठोस निर्णय व्हायला हवा, असेही डॉ. सरमा यांनी नमूद केले. हत्तींचे पालनपोषणाबाबतचे अनुभव कथन केल्यानंतर प्राणी, पक्षी यांच्या अधिवासाला धक्का लावू नका, असे आवाहनही त्यांनी अखेरीस केले.
आमदार श्रीमती यामिनी जाधव यांनी मनोगतात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेणाऱया अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या कामाचे कौतुक केले. मुलांना प्राण्यांविषयी सतत कुतुहल असते आणि ‘वन्यजीव सप्ताह’निमित्त मुलांना उद्यानातील प्राणी, पक्षी पाहता येणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकातून संचालक श्री. त्रिपाठी यांनी ‘वन्यजीव सप्ताह’निमित्त वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात राबविण्यात येणाऱया विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्यानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात श्री. अक्षय राणे (प्रथम), श्री. आशिष तांबे (द्वितीय), इसरार खान (ततीय) यांचा समावेश होता. याशिवाय वाघ प्रदर्शनी येथे वाघांची काळजी घेणारे श्री. अमोल शिंदे आणि उन्हाळी सुटीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील ‘एमसीए’च्या १४ सेंटरमध्ये संधी उपलब्ध करून देणारे श्री. भालेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात उद्यानाच्या माहिती पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा ऱहास थांबवा, झाडे वाचवा, असा संदेश देणारी नाटिका सादर केली. तसेच ‘मी राणीची बाग बोलतेय’, 'प्लास्टिक बंदी', 'वसुधैव कुटुंबकम्' ही चित्रफितही यावेळी दाखविण्यात आली. शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन श्री. सुभाष पाटील यांनी केले.
मंत्री श्री. लोढा यांनी रंगविले चित्र-
‘वन्यजीव सप्ताह’निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा सकाळी नऊ वाजेपासून सुरू होती. या स्पर्धला कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी चित्र रंगविणाऱया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच काही चित्रांमध्येही रंग भरले.
(जसंवि/३८०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा