सायबर फसवणूकीतून मालामाल झालेल्या ११ जणांच्या टोळीला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

सायबर फसवणूकीतून मालामाल झालेल्या ११ जणांच्या टोळीला अटक

कमिशन घेऊन १५० बँक खात्यांची विक्री


मुंबई, दादासाहेब येंधे : साडेआठ लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीप्रकरणी डोंगरी पोलिसांनी कारवाई करून ११ आरोपींना अटक केली. आरोपी बनावट शेअर मार्केट ॲपद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करत होते. ६० वर्षीय तक्रारदारांना एसएमसी नावाच्या बनावट ॲपद्वारे शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची साडे आठ लाखांची सायबर फसवणूक करण्यात आली होती.

या प्रकरणी तपासात डोंगरी पोलिसांनी गौतम गोपाल दास (४८) आणि श्रीनिवास राजू राव (३६) यांना डिसेंबर २०२४ मध्ये अटक केली होती. तपास सुरू असताना आरोपींनी केलेल्या बँक खात्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याद्वारे ओंकार युवराज थोरात (२७) आणि श्रीकांत बाळासाहेब साळुंखे (२२) यांना अटक करण्यात आली. तसेच बँक खातेधारक ओजस चौधरी (३०) यालाही मुंबई सेंट्रल येथून अटक करण्यात आली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथून आणखी ६ आरोपींना अटक केली. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून १५ हून अधिक महागडे मोबाइल, ५ लॅपटॉप व एक टॅब, २ महागड्या कार, एक जग्वार (५० लाख रुपये) आणि महिंद्रा मझारो (८ लाख रुपये) मोटरगाडी जप्त केली आहे. ही टोळी कंबोडिया, नेपाळ येथे जाऊन ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांशी संपर्क साधत होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे आणि प्रभारी निधीक्षक सचिन कोथमीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार गौरव धादवड, उपनिरीक्षक किशोर बच्छाव, गोविंद फड यांच्या पथकाने तपास करीत प्रथम साताऱ्यातील उंब्रज येथून ओंकार थोरात या तरुणाला अटक केली. त्याच्या अटके नंतर एक एक आरोपीची लिंक लागत गेली. आणि पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र आणि गोवा इथून ११ जणांना अटक केली. श्रीकांत साळुंखे, ओजस चौधरी, आकाश दुसाने, दिनेश तायडे, राजिक पटेल, सागर कोल्हे, हर्षल मोरे अमित मिटकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


अटक केलेल्या आरोपींपैकी आकाश, दिनेश आणि राजिक हे तिघे विदेशात बसून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या संपर्कात होते. या तिघांनी नेपाळ, कंबोडिया या ठिकाणी जाऊन मुख्य आरोपींची भेट घेतल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. हे तिघे कमिशनपोटी मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांमधील काही रक्कम गरीब, गरजू, बेरोजगार तरुणांना देऊन त्यांच्याकडून त्यांचे बँक खाते वापरण्यास घेत. या खात्यांचा तपशील टेलिग्रामच्या माध्यमातून विदेशातील आरोपी पर्यंत पोहोचण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज