पाच लाखांत बाळ विक्री करणार होते
मुंबई, (दादासाहेब येंधे) : गोरेगाव येथील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत अपहरण करण्यात आलेल्या बाळाची वनराई पोलिसांनी ६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरुप सुटका केली आहे. अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी परिमंडळ १२च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टीम तैनात करण्यात आल्या होत्या. सहा दिवस अहोरात्र मेहनत करून तब्बल ११ हजार रिक्षा चालक आणि एक लाखाहून अधिक मोबाईल नंबर तसेच हजारो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात वनराई पोलिसांना यश मिळालं.
पोलिसांनी मुंबईच्या मालवणी मालाड परिसरातून चारही आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील बस डेपोजवळ २ मार्चच्या रात्री ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं होतं. याची तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. वेगवेगळी पथकं तयार करुन पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आणि एक आरोपी लहान बाळाला रिक्षातून घेऊन जाताना आढळून आला.
पोलिसांनी तब्बल ११ हजाराहून अधिक रिक्षांची तपासणी केली. आरोपीनं पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. आणि तोच धागा पकडून आरोपीचा शोध सुरू होता. सीसीटीव्हीत दिसून आलेला व्यक्ती मालवणी भागात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. पुढील तपासात बाळ विकण्यासाठी अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली. ५ लाख रुपयांना या बाळाची विक्री केली जाणार होती. तपासात आणखी तीन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान (४२), फातिमा जिलानी शेख (३३), राजू भानुदास मोरे (४७), मंगल राजू मोरे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा