मालाड रेल्वे स्थानकाजवळील आनंद मार्गावरील १९ दुकाने निष्कासित - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, ४ मे, २०२३

demo-image

मालाड रेल्वे स्थानकाजवळील आनंद मार्गावरील १९ दुकाने निष्कासित

पी उत्तर विभागाकडून कारवाई, रस्ते रूंदीकरण होवून वाहतूक कोंडी फुटणार 


मालाड (पश्चिम) मधील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ, आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी १९ दुकाने पी उत्तर विभागाने आज (दिनांक २८ एप्रिल २०२३) निष्कासित केली. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण होतानाच सर्वसामान्य नागरिकांनाही या परिसराचा सुलभ वापर करणे शक्य होणार आहे. 

WhatsApp%20Image%202023-04-28%20at%207.15.02%20PM


मालाड (पश्चिम) मध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकाबाहेरील आनंद मार्गाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी असलेल्या कृत्रिम दागिन्यांची बाजारपेठ आणि मासळी बाजारामुळे दररोज किमान १ लाख २० हजार नागरिकांची वर्दळ या परिसरात असते. उपनगरीय स्थानकाला लागून असलेल्या या परिसरातील बांधकामांमुळे देखील रस्त्यावर नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, पी उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. 


या रस्ता रुंदीकरण रेषेमध्ये एकूण १९९ बांधकामे अडथळा ठरत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आज (दिनांक २८ एप्रिल २०२३) झालेल्या निष्कासनाच्या कारवाईत मालाड मधील एमएम मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर कारवाई झाली. या कारवाईमुळे सुमारे १५ ते २० फूट रस्ता रूंद करणे शक्य झाले आहे. या कारवाईमुळे रस्ता रुंद करुन, वाहतूक सुरळीत करण्यासह नागरिकांनाही रस्त्याचा सुलभपणे वापर करणे शक्य होणार आहे. 

WhatsApp%20Image%202023-04-28%20at%207.15.02%20PM%20(1)


बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ ४) श्री. विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्या पर्यवेक्षणाखाली या १९ दुकानांवर निष्कासनाची कारवाई झाली. त्यामध्ये महानगरपालिकेचे १५ अभियंते,  ४ पोकलेन, २ जेसीबी आणि ४ डंपर तसेच ४० कामगारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.


(जसंवि/०५९ )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *