मुंबई पोलिसांनी रागाने घर सोडून गेलेल्या तिच्या पतीला १७ वर्षांनी आणले घरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५

मुंबई पोलिसांनी रागाने घर सोडून गेलेल्या तिच्या पतीला १७ वर्षांनी आणले घरी

व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी महिलेला पोलीसांकडून गिफ्ट 


मुंबई, दादासाहेब येंधे : पत्नीला सोडून गेलेल्या पतीचा १७ वर्षांनी मुंबई पोलिसांनी शोध घेऊन 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी एका महिलेला गिफ्ट दिले. तब्बल १७ वर्षांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पती पत्नीची पोलीस ठाण्यात झालेल्या भेटीचा क्षण अगदी अंगावर काटा आणणारा होता असे एका अधिकाऱ्याने सांगितले.



चंद्रकांत जोशी असे मागील १७ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीचे असून जोशी हे पत्नी सोबत मुंबईतील काळाचौकी येथे राहत होते. एप्रिल २००७ मध्ये चंद्रकांत जोशी हे कौटुंबिक वादातून अचानक घर सोडून निघून गेले होते. राग कमी झाल्यावर पती घरी पुन्हा येईल या आशेवर पत्नीने १७ वर्षे काढली, अखेर पतीला शोधण्यासाठी तिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. गेल्या वर्षी म्हणजेच मार्च २०२४ मध्ये पत्नीने महिला आयोगाकडे अर्ज करून पतीला शोधून देण्याची विनंती करण्यात आली होती.


महिला आयोगाने काळाचौकी पोलीस ठाण्याकडे ही तक्रार पाठवून तक्रार दाखल करण्याची आणि हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. राज्य महिला आयोग यांच्या मदतीने काळाचौकी पोलिस ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.


जोशी यांचा शोध घेत असताना वेगवेगळया पध्दतीचा उपयोग करून जोशी यांच्या मित्राचा शोध घेऊन पोलीसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्या मित्रापैकी एकाने जोशी यांना २०१५ या २०१६ मध्ये मुरबाड येथे एका फॉर्म हाऊसमध्ये पाहिले असल्याचे सांगितले. परंतू नेमके कोणते फार्महाऊस होते हे त्याला सांगता येत नव्हते. त्यानंतर पुन्हा सर्व फार्महाऊसचा शोध घेत असताना सदर इसमाने एका विशिष्ट जागेचे नाव घेतल्याचे जाणवल्याने पुन्हा त्या ठिकाणी जावून मुरबाड परिसरातील वेगवेगळया फार्म हाऊस मध्ये नमूद व्यक्तीचा शोध घेतला असता मौजा चौरे या गावातील एका फार्म हाऊस मध्ये चंद्रकांत कानू जोशी हे काम करत असताना मिळून आले.


व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारी च्या दिवशी चंद्रकांत जोशी यांना काळाचौकी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांची पत्नी यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. १७ वर्षांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पतीला बघून पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघत होते. १७ वर्षे बेपत्ता असलेल्या चंद्रकांत जोशी यांचा शोध त्यांच्या पत्नीला पोलिसांनी व्हॅलेंटाईन डे चे गिफ्ट मिळाल्याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरू होती. पतीचा शोध घेऊन दिल्याबद्दल महिलेने मुंबई पोलिस तसेच काळाचौकी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज