अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सादर झाला नाट्य प्रयोग
दक्षिण मुंबईला मिळाले तब्बल ७५० आसनी नवे नाट्यगृह
"बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली रंगभूमीवरील प्रकाशयोजना आणि ध्वनी व्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी उंची आणि अंतर, नाट्यगृहात असणाऱ्या सोयी सुविधा आणि अत्यंत कल्पकतेने उभारलेली देखणी वास्तू यामुळे हे नाट्यगृह नाट्यरसिकांना आणि कलाकारांनाही निश्चितपणे आवडेल, असा विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
भायखळा पूर्व रेल्वे स्टेशन पासून जवळ असणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाजवळील ई. एस. पाटणवाला मार्गावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची देखणी वास्तू नुकतीच मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. नाट्यरसिकांसाठी तब्बल ७५० आसनांची व्यवस्था असणाऱ्या या भव्य वास्तूमध्ये 'चारचौघी' या मराठी नाटकाचा प्रयोग गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच दि. २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे या एक रसिक प्रेक्षक म्हणून आवर्जून उपस्थित होत्या. तर परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉक्टर श्रीमती संगीता हसनाळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकही या नाट्यप्रयोगाला उपस्थित होते.
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित 'चारचौघी' या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर या मान्यवर कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या कलाकारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे या स्वतः प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत, असे कळल्यानंतर त्यांनी नाट्य प्रयोगाच्या अखेरीस अतिरिक्त आयुक्तांना रंगमंचावर बोलवून व पुष्पगुच्छ देत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे नवे नाट्यगृह अतिशय देखणे आणि सुविधापूर्ण असल्याचा सर्वच कलावंतांनी आवर्जून उल्लेख केला.
जसंवि/४७२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा