मुंबई, दि. २३ : गुढीपाडवा आणि शोभायात्रा, स्वागतयात्रा हे मुंबईतील समीकरण गेल्या दोन दशकांपासून मराठी नव्या वर्षाचे संस्कृती आणि परंपरेच्या साथीने स्वागत करण्याची रित मुंबई आणि उपनगरात रुजली आणि पुढील पिढीने या परंपरेचे पालखी आपल्या खांद्यावरही घेतली. त्यामुळे शहर आणि उपनगरात बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त स्वागत आणि शोभयात्रांचा जल्लोष दिसून आला. मराठमोळ्या वेशातील आबालवृद्ध, पारंपारिक साज शृंगार, ढोल, ताशे, झांजा, लेझीम , दांड पट्टा यांचा ताल सूर आणि या सर्वांहून देखण्या उपस्थितांचा ओसंडून वाहणारा उत्साह यामुळे शहरात आनंदाचे भरते आले होते. कोरोना झाकोळामध्ये गेल्यावर्षी मर्यादित स्वरूपात यात्रा निघाल्या होत्या. मात्र, यंदा ती कसर भरून निघाली.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विविध शोभायात्रांमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. बच्चे कंपनीही पारंपारिक वेशभूषांमध्ये सहभागी झाले होते. कुठे शिवाजी महाराज, तर कुठे राणी लक्ष्मीबाईचे रूप घेऊन मराठी मातीतील धाडसाची आठवण या लहान मुलांनी करून दिली. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये घोड्यांवर स्वार होऊन काही मावळे, काहीजण बाजीप्रभू देशपांडे बनले होते. यांनी उपस्थितांचे खास लक्ष वेधले. मराठी मातीतील खेळांची ओळख करून देणाऱ्या दोरी, मल्लखांब यांची प्रात्यक्षिक देखील शोभायात्रेत सहभागी झालेल्या चित्ररथावर सादर करण्यात येत होती.
गिरगाव, लालबाग, परळ, कुर्ला, टिळक नगर, गोरेगाव, डोंबिवली, ठाणे, कल्याण, मुलुंड, विलेपार्ले या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा