मुंबई, दि. ७ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध कार्यालये ही महिलांसाठी सुरक्षित असावीत. या हेतूने 'लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समिती' विविध कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या समितीची एक विशेष बैठक नवरात्रोत्सवाच्या औचित्याने नुकतीच आयोजित करण्यात आली होती. समिती अध्यक्ष तथा प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या बैठकी दरम्यान एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासाठीच्या ‘कार्यस्थळी लैंगिक अत्याचार प्रतिबंध समिती’मार्फत महानगरपालिका मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये लैंगिक अत्याचाराबाबत जागरूकता आणण्याच्या दृष्टीने या बैठकीचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यालयातील महिला अधिकारी व कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर (श्रीमती) मंगला गोमारे आणि सावित्रीबाई फुले संसाधन समितीच्या सचिव श्रीमती अपूर्वा प्रभू, प्रमुख कर्मचारी अधिकारी श्रीमती अपूर्वा मोरे आणि मान्यवर महिला अधिकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) तथा समिती अध्यक्षा श्रीमती रश्मी लोखंडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार कशा प्रकारचे असू शकतात आणि या विरोधात तक्रार नोंदवणे का आवश्यक असते, याची माहिती दिली. तर के. सी. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महिला अत्याचाराच्या स्वरूपावर एक पथनाट्य सादर केले. श्रीमती अपूर्वा प्रभू यांनी विशाखा मार्गदर्शक तत्वे तसेच लैंगिक अत्याचाराबाबत असणारे विविध कायदे व तरतुदी यांची माहिती दिली.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर (श्रीमती) मंगला गोमारे यांनी महिलांना लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. तसेच महानगरपालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस श्रीमती रश्मी लोखंडे यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
जसंवि/२७२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा