मुंबई, दि. ५ : शिवडी येथील जैन मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन जणांना रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुजरातमधून नुकतीच अटक केली. पोलिसांनी ७० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांत फुटेज तपासणी करून या तिघांच्या मुसक्या आवळल्या.
श्री शिवडी जैन संघ यांच्या मालकीचे शिवडी येथील मंदिरात २२ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास चोरी करण्यात आली होती. काही आरोपींनी मंदिराचा दवाजा तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम असा एकूण ७ लाखांचा ऐवज चोरी केला होता. चोरी करण्यापूर्वी आरोपींनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी कापल्या होत्या. त्यामुळे आरोपींची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी मंदिर परिसरात येण्या-जाण्याच्या २९ मार्गांवरील सुमारे ७० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजची तपासणी केली. सदर आरोपी हे गुजरातच्या बनासकंठा जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यातील भाकरमोटी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने भाकरमोटी गावात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि तिघांना तेथून अटक केली.
सुनिलसिंह दाभी (२३) राहुलसिंग वाघेला (२०) जिगरसिंग वाघेला (१९) अशी अटक आरोपींची नावे असून आरोपींनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरएके मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप ऐदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहीते, गोविंद खैरे, पो.ह.वा. घार्गे, कोळेकर, केकाण, शिवमत, शेडगे, म्हात्रे, देशमुख, राणे, परदेशी, ठोके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा