मुंबई, दि. १२ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली, तरी दोन्ही देशांतील वाढलेला तणाव पाहता मुंबई पोलिसांनी शहरात खबरदारी म्हणून एक प्रतिबंधात्मक आदेश आदेश नुकताच जारी केला आहे.
या आदेशानुसार, मुंबईत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही कार्यक्रमात फटाके फोडता येणार नाही. मुंबई पोलिसांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे, जेणेकरून शहरात कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अफवा पसरू नये. पोलिसांनी सांगितले, फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे लोक गोंधळून जाऊ शकतात आणि त्याचा संबंध कोणत्याही धोक्याशी जोडू शकतात. अशा परिस्थितीत जनतेमध्ये भीती किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील शांततेला बाधा पोहोचू शकते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फटक्यांवरील ही बंदी हा एक सुरक्षात्मक उपाय आहे आणि याचा उद्देश शहरातील शांतता कायम राखणे हा आहे. विशेषतः जिथे गर्दी आणि अफवा जलद पसरण्याची शक्यता असते अशा संवेदनशील भागांमध्ये हा उपाय अत्यंत आवश्यक होता, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या आदेशाचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारच्या असामाजिक कृत्यांपासून दूर राहावे. भारत-पाक संबंधांमध्ये सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय एक जबाबदार आणि सावधगिरीचे पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ११ मे ते ९ जून २०२५ या कालावधीत बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीने फटाके, आतषबाजी, रॉकेट्स किंवा असे फटाके फोडू नयेत किंवा आकाशात उडवू नयेत असे म्हटले आहे. हा आदेश महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ३३(१)(यू) आणि कलम १०(२) यांच्या तरतुदींनुसार लागू करण्यात आला आहे.
उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, आणि सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेसाठी हा निर्णय आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा