मुंबईतील स्थितीचा घेतला आढावा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, १० जून, २०२१

demo-image

मुंबईतील स्थितीचा घेतला आढावा

महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी हिंदमाता येथे केली संयुक्त पाहणी
 
मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी काल (९जून) सकाळीच आपत्कालीन नियंत्रण कक्षास भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रारंभिक माहिती जाणून घेतली. यानंतर महापौर व आयुक्त यांनी हिंदमाता परिसरातील सखल भागामध्ये संयुक्त भेट देवून पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच अधिकारी, कर्मचाऱयांना आवश्यक त्या सूचना केल्या.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने व प्रभावीपणे होत आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर व समुद्रास भरती असताना अतिशय सखल भागांमध्ये पाणी साचते, हा नेहमीचा अनुभव आहे. असे असले तरी मुंबईत बांधलेल्या उदंचन केंद्रांमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने म्हणजे अवघ्या तीन ते चार तासांत पाण्याचा निचरा होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. मुंबईतील एकंदर स्थिती पाहता जिथे पाणी साचले, अश्या ठिकाणी भेटी देऊन तेथील नेमकी कारणे समजून घेऊन त्यावर योग्य त्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापौरांनी नमूद केले. हिंदमाता येथील पाणी निचरा करणारी वाहिनी ब्रिटानिया उदंचन केंद्राला जोडण्याचे अवघे १०० मीटरचे काम बाकी असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा आणखी जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. कोणत्याही स्थितीत मुंबईकरांना दिलासा देता येईल, याकडे महानगरपालिका लक्ष ठेवून असल्याचे महापौरांनी अखेरीस सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानंतरही रस्ते वाहतुकीमध्ये खंड पडलेला नाही. हिंदमाता येथे अतिशय सखल भागामध्ये पाणी साचले तरी हिंदमाता परिसरासाठी यंदा बांधलेल्या रॅम्पमुळे वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरु आहे. जोरदार पाऊस व भरतीच्या वेळी हिंदमाता परिसरात साचणारे पाणी हे सेंट झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये साठविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या भूमिगत टाक्यांना जोडणाऱया भूमिगत वाहिन्या टाटा मिल परिसरातून नेण्यासाठी दिनांक ३१ मे २०२१ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे. यामुळे भूमिगत जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला आता वेग दिला जात आहे. ते काम पूर्ण झाले की हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल. हिंदमाता भागात वाहतूक पावसाळी पाण्यामुळे बंद झाली नाही, असे पंधरा वर्षात प्रथमच घडले आहे आणि त्याला कारण आहे ते महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, मुंबईतील उर्वरित परिसरांचा विचार करता, अंधेरी सब वे यापूर्वीच तीन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे तेथे पाणी साचून वाहतुकीवर परिणाम होण्याचा प्रश्न नाही. शीव रेल्वे स्थानक भागामध्ये रेल्वे प्रशासनाशी संबंधित मुद्यांवर कार्यवाही करुन तेथील समस्या सोडविण्यात येत आहे. एवढा एक अपवाद वगळता पूर्ण मुंबईत कोठेही वाहतूक बंद झालेली नाही. एका तासात ६० मिलीमीटरपेक्षा अधिक इतका पाऊस कोसळला तर पाण्याचा निचरा करताना काही तासांसाठी कसोटी लागते. तरीही संपूर्ण महानगरात पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेगाने पाण्याचा निचरा होतो, असे आयुक्त श्री. चहल यांनी अखेरीस नमूद केले.

दरम्यान, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी मुलूंड येथील बाऊंड्री नाला, भांडूप (पूर्व) येथील उषानगर नाला यासह पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भेटी देवून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. तसेच स्थानिक विभाग कार्यालयांच्या अधिकाऱयांना आवश्यक ते निर्देशही दिले.

4























( जसंवि/ १५५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *