पहलगामच्या पार्श्वभूमीवर ४० आरोपींवर कारवाई, हॉटेल, लॉजची कसून तपासणी
मुंबई, दि.२९ : काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसही सतर्क झाले असून, त्यांनी नुकतेच 'ऑल आऊट ऑपरेशन' राबवले. पोलिसांनी शनिवारी रात्री ११पासून रविवारी पहाटेपर्यंत राबवलेल्या या मोहिमेत नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, गस्त घालत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या १० जणांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांची धरपकड करण्यात आली. चार ते पाच तासांच्या मोहिमेत पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी मुंबईतील महत्त्वाची पोलिस ठाणी, नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिली. १९२ संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून झाडाझडती घेतली. वेगवेगळ्या गुन्ह्यांत हव्या असलेल्या १० जणांना पकडण्यात आले. ४० जणांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ, जुगार तसेच इतर अवैध ठिकाणी धाडी टाकून १९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेत २८ आरोपींवर अजामीनपात्र वॉरंट, तर दोघांवर वॉरंट बजावण्यात आले.
संशयास्पदरित्या फिरणाऱ्या ६४ जणांचीही पोलिसांनी धरपकड केली. वाढते गुन्हे, घातपात, तसेच मोकाट आरोपींविरोधात मुंबई पोलिसांच्या वतीने 'ऑल आऊट ऑपरेशन' राबवले जाते. राजकीय कार्यक्रम, निवडणुका, महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, सण-सोहळ्यांच्या तोंडावर सावधगिरी म्हणून ही मोहीम हाती घेतली जाते. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल, लॉज तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या विदेशी, परराज्यातील नागरिकांची माहीती काढण्यात येत आहे. बांगलादेशी, पाकिस्तानी यांच्यासह अन्य देशातील बेकायदेशीर वास्तव्यास असलेले नागरिक पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
६३ मद्यपी चालक आढळले
मुंबई पोलिसांनी मुंबईत 'ऑल आऊट ऑपरेशन' दरम्यान १११ ठिकाणी नाकाबंदी लावली होती. यात सात हजार २३५ वाहनांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ८३६ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली, तर या नाकाबंदीमध्ये ६३ वाहनचालक दारू पिऊन वाहन चालवताना आढळले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा