रस्त्यावर थुंकल्याचा ४० हजार दंड घेणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

रस्त्यावर थुंकल्याचा ४० हजार दंड घेणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) :  ठाण्यात राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीकडून रस्त्यावर थुंकल्याचा दंड म्हणून ४० हजार रुपये वसूल केल्याप्रकरणी एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला भांडुप  येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा पोलीस बनून लोकांची लूटमार करीत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

रवी पांडे (वय, २८) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून रवी पांडे  हा भांडुप पश्चिम येथे राहण्यास आहे. २५ फेब्रुवारी रोजी ठाण्यात राहणारे ५८ वर्षीय वसंत मोहिते हे मोटारसायकलने ऐरोली येथून मुलुंड मार्गे ठाण्याकडे जात असताना मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग येथे थांबले आणि तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकले, त्याच दरम्यान बुलेट एनफिल्ड मोटारसायकल त्यांच्याजवळ येऊन थांबली, मोटारसायकल वरून खाकी पॅन्ट काळ्या रंगाचे बूट घातलेला व्यक्ती उतरला आणि त्याने मोहिते यांची कॉलर पकडून स्वतःला नार्कोटिक्स डिपार्टमेंटचा पोलीस अधिकारी असल्याची ओळख करून देत रस्त्यावर थुंकणे गुन्हा आहे, मला तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगून मोहिते यांना त्याने त्याच्या बुलेटवर बसायला सांगून पोलीस ठाण्यात जावे लागेल असे सांगून मुलुंड गोरेगांव रोड येथे घेऊन आला, आणि त्याने मोहिते यांनी ६८ हजार दंड भरण्यास सांगितले.

 

घाबरलेल्या मोहिते यांनी जवळच्या एका एटीएम मधून ४० हजार रुपयांची रोकड काढून त्या व्यक्तीला देऊन सुटका करून घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घडलेला प्रकार एका मित्राला सांगितला असता त्यांची फसवणूक झाल्याचे मित्राने सांगितले. मोहिते यांनी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दिलेल्या वर्णनावरून, आरोपी काळे बूट, खाकी पॅन्ट आणि राखाडी-निळा शर्ट घालून काळ्या रॉयल एनफील्ड बुलेटवर बसला होता असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. नवघर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा माग काढला असता आरोपी हा भांडुप पश्चिम येथे राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भांडुप येथून रवी पांडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज