धडक कारवाई
करण्यात आली कारवाई
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माहीम परिसरातील माहीम चौपाटी लगतच्या समुद्रीय क्षेत्रात अतिक्रमणे उद्भवत असून ते तात्काळ निष्कासित करण्याबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी यांचे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास दि. २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी प्राप्त झाले. सदर पत्रानुसार 'परिमंडळ २' चे उप आयुक्त श्री. रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनात व ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत लक्ष्मण सपकाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान संबंधित परिसरातील ४० ते ५० झोपड्या हटविण्यात आल्या आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाद्वारे देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना 'जी उत्तर' विभाग कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील कामगार – कर्मचारी – अधिकारी यांच्या चमुने आज सकाळपासूनच अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात सुरुवात केली. सदर अतिक्रमण हे धार्मिक स्वरूपाचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता पोलीस खात्यामार्फत माहीम क्षेत्रात काटेकोर बंदबोस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सदर कार्यवाही दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी गठीत केलेली पथके देखील हजर होती.
वरील तपशिलानुसार करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलनाची सदर कारवाई ही संपूर्णपणे मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
सदर निष्कासन योग्य नियोजनाने पार पाडण्यात आले. तसेच घटनास्थळी तैनात असलेल्या सर्व संबंधितांनी घटनास्थळी कुठलीही अनुचित घटना घडू दिली नाही. सदर अतिक्रमण धार्मिक स्वरूपाचे व अत्यंत संवेदनशील होते. तथापि, आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आल्याने सदर ४० ते ५० अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई सुरळीतपणे, सुयोग्यप्रकारे व शांततेत पार पडली, असे ‘जी उत्तर’ विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
जसंवि/४७३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा