‘माझी मुंबई’ या विषयावरील खुल्या बालचित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद ! - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

demo-image

‘माझी मुंबई’ या विषयावरील खुल्या बालचित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद !

रविवारी सकाळी विविध ४५ ठिकाणी आयोजित स्पर्धेत तब्बल ७७ हज़ार ४५३ विद्यार्थ्यांचा सहभाग


येत्या २१ जानेवारी रोजी होणार पारितोषिक विजेत्यांची घोषणा, तर जानेवारी अखेरीस मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण


मुंबई, दि. १० :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कला विषयक विविध उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमांच्या शृंखलेत ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी करण्यात येते. यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार 'महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा' आज़ सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला आज मुंबईकर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद दिला. मुंबईतील तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत 'माझी मुंबई' या विषयावर कल्पक - अभिनव आणि आकर्षक चित्रे चितारली. या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांची घोषणा येत्या २१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे; तर हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे उप आयुक्त श्री. केशव उबाळे यांनी दिली आहे. 

WhatsApp%20Image%202023-01-08%20at%205.09.50%20PM


याबाबत अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी सांगितले की, गेली २ वर्षे कोविड साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा; यंदा प्रत्यक्ष स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त, उत्साहवर्धक आणि विक्रमी प्रतिसाद दिला. तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांमध्ये प्रामुख्याने मालाड परिसराचा समावेश असलेल्या 'पी उत्तर' विभागात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या खालोखाल प्रामुख्याने 'कुर्ला' परिसराचा समावेश असलेल्या 'एल' विभागात ५ हज़ार ४६५; तर दादर परिसराचा समावेश असलेल्या 'एफ उत्तर' विभागामध्ये ५ हजार १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.


WhatsApp%20Image%202023-01-08%20at%205.10.44%20PM%20(2)


या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे चितारणा-या स्पर्धकांसाठी रुपये ५००/- ते रुपये २५ हजारांपर्यंतची तब्बल ५५२ पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग घेतल्याचे प्रशस्तीपत्र आज स्पर्धा संपल्यानंतर लगेचच देण्यात आले. विशेष म्हणजे प्रशस्तीपत्र देण्यात आल्यानंतर सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खाऊ देखील देण्यात आला.


बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ‘माझी मुंबई’ या विषयावर भव्य चित्रकला स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. या लोकप्रिय स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून यावर्षी देखील ही स्पर्धा एकूण ४ गटात घेण्यात आली. याअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्यांचा पहिला गट, इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट, इयत्ता सहावी ते आठवीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी तिसरा गट; तर इयत्ता नववी ते दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या चौथा गट; असे चार गट होते. या चारही गटातून ७७ हजार ४५३ स्पर्धकांनी भाग घेतला. तर या स्पर्धेच्या आयोजनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासह बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल आणि इतर विभागांचे मिळून ११ हजारांपेक्षा अधिक महानगरपालिका कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत होते.


वरील नुसार चारही गटातील स्पर्धकांसाठी एकूण ५५२ रोख पारितोषिके असणार आहेत. या अंतर्गत प्रत्येक गटात रुपये २५ हजारांचे प्रथम पारितोषिक, रुपये २० हजारांचे द्वितीय पारितोषिक, रुपये १५ हजारांचे तृतीय पारितोषिक आणि रुपये ५ हजारांची १० पारितोषिके असणार आहेत. तर या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभाग स्तरावर उत्तम चित्रांसाठी रुपये ५००/- इतक्या रकमेची पाचशे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांची घोषणा येत्या २१ जानेवारी रोजी करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण हे या महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे; अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यातील कला उपविभागाचे प्राचार्य श्री. दिनकर पवार यांनी दिली आहे.


(जसंवि/ ३५२)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *