मुंबई, दि. १४ : मुंबई मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ कर्मचारी सुरेश ठुकरूल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक सोहळ्यात सुरेश ठुकरुल यांच्याबाबत विविध मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणींमुळे पत्रकार संघाच्या वैभवशाली आठवणींना उजाळा मिळाला.
सुरेश ठुकरूल यांनी आपल्या ३४ वर्षात पत्रकार संघाच्याप्रति कर्तव्य तर पार पाडलेच, पण त्यांच्या पत्रकार संघावरील निष्ठेमुळेच त्यांना निरोप देण्यासाठी पत्रकार क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. सुरेश ठुकरुल यांच्या बँकेत किती पैसे आहेत मला माहीत नाही पण सुरेशची माणसांची बँक फार मोठी आहे. कधीही न आटणारी आहे. हीच त्याची कमाई आहे अशा शब्दात पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सुरेशचे कौतुक केले. सुरेशसोबतच दयानंद जाधव, मुनाफ पटेल, प्रभाकर हंकारे, स्नेहल मसुरकर हे कर्मचारी म्हणजे पत्रकार संघाचे पिलर आहेत, अशा शब्दांत चव्हाण यांनी सर्व कर्मचार्यांचे कौतुक केले. पत्रकार संघाच्या कार्यकारिणीतर्फे, तसेच माजी अध्यक्ष आणि माजी विश्वस्त यांजकडून ३३ हजार रुपयांचा गौरव निधी सुरेश ठुकरुल यांना प्रदान करण्यात आला. तसेच लवकरच गौरवनिधीचा संकल्पही उभारण्याचा संकल्प पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले.
सुरेश ठुकरूल या कर्मचार्याचा कौतुक सोहळा ज्या थाटामाटात मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केला, ही बाब राज्यातील सर्वच पत्रकार संघासाठी आदर्शवत आहे, अशा शब्दात माजी मंत्री महादेव जानकर यांनी या सोहळ्याचे वर्णन केले. सुरेशचे पत्रकार संघासाठीचे योगदान मोठे आहे म्हणून मी माझ्या पक्षातर्फे त्यांना २५ हजार रुपये देत आहे, असे माजी मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी जाहीर केले.
सुरेशसारख्या कर्मचार्यांमुळेच पत्रकार संघाचे कार्य सुरळीत सुरू आहे, असे सांगत सुरेश निवृत्त जरी झाला असला तरी तो पत्रकार संघाच्या कामात यापुढेही कार्यरत राहील असा निर्णय कार्यकारिणीने घेतला, असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दिमाखात ज्या काही मोजक्या संघटना कार्यरत आहेत त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाचा नंबर खूपच वरचा आहे आणि त्यात सुरेश ठुकरुल, दयानंद जाधव आणि कै. गणपत सकपाळ सहीत संघाच्या कर्मचारी सहकार्यांचे योगदान मोठे आहे, अशा शब्दात माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी कौतुक केले.
सुरेश ठुकरुल आणि दया जाधवसारख्या निष्ठावान कर्मचार्यांमुळेच पत्रकार संघाचे दैंनदिन काम सुरळीत सुरू असते. सुरेशसारखाच दयानंद जाधव यांचाही यथोचित सत्कार भविष्यात करावा, अशी सूचना माजी अध्यक्ष अजय वैद्य यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघाने जो माझा कौतुक सोहळा आयोजित केला आहे, त्यासाठी अध्यक्ष संदीप चव्हाण आणि त्यांच्या कार्यकारिणीचे ऋण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. पत्रकार संघाचा कर्मचारी ही माझी ओळख मी आयुष्यभर अभिमानाने मिरवली, असे सत्काराला उत्तर देताना सुरेश ठुकरूल म्हणाले.
सुरेश ठकुरुल यांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, दिवाकर शेजवळ, विजय तारी, घन:श्याम भडेकर, प्रदीप कोचरेकर, रविंद्र खांडेकर, सदानंद खोपकर, आत्माराम नाटेकर, गजानन सावंत, राजेश खाडे, विनोद साळवी, हेमंत सामंत, राजेश माळकर, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा