मुंबई, (दादासाहेब येंधे) : उत्तर प्रदेश येथील आजमगढ जिल्ह्यातील एका सराईत हाय प्रोफाईल पद्धतीने चोरी करणाऱ्या चोराला मुलुंड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. हा चोर मुंबईत चोरी करण्यासाठी विमानाने येत असे आणि आठवडाभर मुंबईत चोऱ्या करून पुन्हा यूपीला विमानाने परत जात होता.
त्याच्यावर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राजेश अरविंद राजभर (३२) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव असून राजेश राजभर हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील आजमगढ जिल्ह्यातील लालगंज येथे राहणारा आहे. १७ मार्च रोजी मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका घरात जवळपास चार लाख रुपयांची घरफोडी झाली होती. दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन खाडगे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि. सुनील करांडे आणि पथक यांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या मार्फत आरोपी राजेश राजभर याला ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून अटक करण्यात आली.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरामध्ये चोरी करण्यासाठी तो यूपी येथून विमानाने मुंबईत येत असे. १५ दिवसांत घरफोड्या करून तो पुन्हा विमानाने यूपीला पळून जात होता, अशी माहिती मुलुंड पोलिसांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली. राजभर हा १३ मार्च रोजी मुंबईत आला होता, आणि त्याने २९ मार्च २०२५ या कालावधीत मुलुंड, भांडुप, नेहरू नगर, उलवे येथे पाच घरफोड्या केल्या होत्या. पुढे त्याला आणखी गुन्हे करायचे होते. मात्र, तत्पूर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. मुलुंड पोलिसांनी राजभर याच्याकडून पाचही गुन्ह्यातील २८ तोळे सोनं, २ किलो चांदी जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर यांनी दिली. राजभर याच्या दुसऱ्या पत्नीच्या भावाला सोलापूर येथे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे दोघे एकत्र मुंबई आले होते. त्यानंतर राजभर हा मुंबईत राहून गुन्हे करत असे तर त्याचा मेव्हुणा हा पश्चिम महाराष्ट्र येथे चोऱ्या करण्यासाठी गेला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा