चर्नीरोड स्टेशन नजिकच्या परिसरातील ३२ अनधिकृत झोपड्या हटविल्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

चर्नीरोड स्टेशन नजिकच्या परिसरातील ३२ अनधिकृत झोपड्या हटविल्या

कारवाईसाठी ‘डी’ विभागाच्या ८० कर्मचारी कार्यरत, तर वाहतूक पोलिसांचे सहकार्य

मोठे पाईप उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रा मशिन, जेसीबीचा कारवाईसाठी वापर


मुंबई, दि. २८ : चर्नीरोड स्टेशन (पूर्व) नजिक असणा-या महर्षी कर्वे मार्गावर गेल्या काही आठवड्यांमध्ये सुमारे ३२ अनधिकृत झोपड्या उद्भवल्या होत्या. पदपथांवर व पदपथानजिक या झोपड्यांमुळे पादचा-यांना पदपथावर चालण्यास अडथळा येत होता. ज्यामुळे, अनेक पादचारी हे पदपथा नजिकच्या रस्त्यावरुन चालत असल्याने अपघाताची संभाव्यता वाढण्यासोबतच वाहतुकीला देखील अडथळा येत होता. ही बाब लक्षात घेऊन तसेच याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्याही संदर्भाने आणि परिमंडळ १ च्या उप आयुक्त डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान  या ३२ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ८० कामगार - कर्मचारी - अधिकारी यांची चमू घटनास्थळी कार्यरत होती. त्याचबरोबर मोठ्या आकारातील पाईप उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रा मशिन देखील या कारवाईसाठी वापरण्यात आले, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे यांनी दिली आहे. 

 


मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपले क्षेत्र अतिक्रमणमुक्त असावे, यासाठी देखील अव्याहतपणे कार्यरत असते. यानुसार आज ‘डी’ विभागातील सैफी रुग्णालया जवळ असणा-या परिसरात आणि चर्नीरोड स्टेशन लगत असणा-या महर्षी कर्वे मार्गावर पावसाळ्या दरम्यान ३२ अनधिकृत झोपड्या उद्भवल्या होत्या. या अतिक्रमणांवर आज धडक कारवाई करण्यात येऊन  सदर पदपथ मोकळा करण्यात आला आहे. यामुळे पादचा-यांना पदपथाचा उपयोग करणे अधिक सुलभ होणार आहे. 



आज करण्यात आलेल्या कारवाईसाठी ‘डी’ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुरेश कनोजा, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) श्री. संजय पोळ, वाहतूक पोलिस अधिकारी श्री. खिलारे, दुय्यम अभियंता (रस्ते) श्री. अभिजित रसाळ यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातील ८० कामगार - कर्मचारी - अधिकारी घटनास्थळी कर्तव्यावर कार्यरत होते. झोपड्या हटविल्यानंतर सदर ठिकाणी कीटक नियंत्रण खात्याद्वारे फवारणी करण्यासह संबंधित कचरा डंपरद्वारे तात्काळ हटविण्यात आला आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर पदपथ बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. करण्यात आली आहे, अशीही माहिती श्री. उघडे यांनी दिली आहे.  


 

जसंवि/२५५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज