कुंभमेळ्याच्या बहाण्याने फसवणूक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

कुंभमेळ्याच्या बहाण्याने फसवणूक

बनावट वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील टोळीला मुख्य आरोपीसहित अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : प्रयागराज येथील कुंभमेळ्याची देशातच नाही तर संपूर्ण जगात मोठी चर्चा सुरू आहे. जगभरातून लाखो भाविक वेगवेगळ्या माध्यमातून कुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रयत्नशील असून इंटरनेट तसेच इतर ठिकाणी याबाबत चौकशी केली जात आहे. याच संधीचा फायदा घेऊन सायबर चोर अनेक नागरिकांना गंडा घालत असल्याच्या घटना पुढे येत आहेत.

राहण्यासाठी तंबू, रेल्वे प्रवास, विमान प्रवास, हॉटेल बुकिंग यासह हेलिकॉप्टर राईडच्या नावाखाली भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील एक महिला श्रीमती कोठेकर यांनी प्रयागराज येथे हेलिकॉप्टर रायडींगसाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. मात्र, यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात केली. 


श्रीमती कोठेकर व त्यांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यास भेट देऊन हेलिकॉप्टर राईड करायचे असल्याने त्यांनी दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी गुगल वर महाकुंभ Helicopter Ride असे सर्च केले असता त्यांना सर्वात वर https://mahakumbhhelicopterservice.online ही युआरएल सर्वात वर दिसून आली. त्यावर तक्रारदार यांनी वेबसाईट मध्ये संपर्कासाठी नमूद केलेल्या मोबाईल (९१२४९९५१८२) क्रमांकावर संपर्क साधला असा समोरून व्यक्तीने तक्रारदार यांना २६ जणांचे डिस्काउंट देऊन एकूण ६०,६५२ रुपये होतील असे सांगून पेमेंट साठी क्यूआर कोड पाठवला त्यानंतर तक्रारदार यांनी समोरील व्यक्तीला ६०,६५२ रुपये ट्रान्सफर केले. ट्रान्सफर केलेले हे पैसे पवनहंस या सरकारी कंपनीला न जाता सोनामुनी देवी या महिलेच्या बँक खात्यात गेले असल्याने तक्रारदार यांना सदर व्यवहाराबाबत शंका आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रारदार यांनी सदर वेबसाईट सर्च करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गुगल वर ती वेबसाईट दिसून आली नाही. त्यामुळे श्रीमती कोठेकर यांनी तेथे दिलेल्या मोबाईल धारकास संपर्क साधून त्यांनी बुक केलेल्या तिकिटाबाबत त्याच विचारणा केली असता त्यांना तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यावर आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आके असता त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल केली. तसेच कुलाबा परिसरात राहत असलेले संकल्प जगदाळे यांचीदेखील हेलिकॉप्टर राईड या वेबसाईटवरद्वारे महाकुंभ मध्ये हेलिकॉप्टर राईड देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती.


तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करीत असताना  तक्रारदारांकडून घेतलेली रक्कम बिहार येथील एटीएम सेंटर मधून काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी जयदीप गायकवाड, सायबर अधिकारी सहाय्यक निरीक्षक अमित देवकर, उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत, प्रवीण रणदिवे यांच्या पथकाने तपास करीत बिहार येथून अविनाशकुमार उर्फ बिट्टू , मुकेश कुमार, सौरभकुमार यांना अटक केली आहे. या टोळीला सिमकार्ड पुरवणाऱ्या सृष्टी बर्नावेल या तरुणीला देखील ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज