महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचे करणार रेबीज प्रतिबंध लसीकरण - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचे करणार रेबीज प्रतिबंध लसीकरण

 २८ सप्टेंबरः जागतिक रेबीज दिन

आरोग्य खात्याच्या पुढाकाराने व प्राणिप्रेमी संस्थांच्या सहकार्याने राबविणार मोहीम


मुंबई, दि. २९ : दरवर्षी जगभरात २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पाळण्यात येतो. मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधांसह आरोग्य सुविधा देणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. यावर्षी देखील विविध जनजागृती कार्यक्रमांसह बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा व उप आयुक्त (विशेष) श्री. संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणा-या या मोहिमे अंतर्गत साधारणपणे ५ हजार भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणा-या विविध प्राणिप्रेमी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली आहे. 


दिनांक २८ सप्टेंबर रोजीच्या जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने अधिक माहिती देताना डॉ. पठाण यांनी सांगितले की, रेबीज हा संसर्गजन्य रोग आहे की, जो श्वान आणि मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. जेव्हा रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते, तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज हा १०० टक्के घातक आजार असला, तरी या आजारास १०० टक्के प्रतिबंध करता येतो. हा रोग देशातील मृत्यू आणि विकृतीच्या प्रमुख कारणांपैकी नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून हा रोग निश्चितपणे ओळखला जातो.


याबाबत उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी साधारणपणे सुमारे दीड कोटी (१५ दशलक्ष) लोकांना जनावरे चावतात. तर दरवर्षी या रोगाने मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. याबाबत ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणी श्वानांचा संबंध असतो, त्यातही भटक्या श्वानांची संख्या अधिक असते. या रोगाचा प्रादुर्भाव १.७ टक्के असल्याचा अंदाज आहे. देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते. भटके श्वान व मानवांमध्ये केवळ आंशिक लसीकरण हा रोगाचा प्रमुख जोखीम घटक मानला जातो. या अनुषंगाने श्वानांचे संख्या नियंत्रण आणि श्वानांचे सक्तीचे लसीकरण यावर अधिकाधिक भर देणे गरजेचे आहे. तसेच याबाबत सार्वजनिक शिक्षण व जनजागृती करण्याबाबतही नियमित कार्यक्रम रोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो. हीच बाब लक्षात घेऊन दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पाळण्यात येतो व या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे व मोहिमांचे आयोजनही करण्यात येते. 


जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या पुढाकाराने आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्राणिप्रेमी संस्थांच्या सहकार्याने भटक्या श्वानांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तर ज्यांच्या घरी पाळीव श्वान किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे. तरी ज्यांच्या घरी पाळीव श्वान, मांजर इत्यादी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी त्यांच्या पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा रेबीज प्रतिबंधात्मक लस न विसरता अवश्य द्यावी, असेही डॉ. पठाण यांनी आवर्जून नमूद केले आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या पुढाकाराने राबविण्यात येणारी भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम ही येत्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राबविण्याचे नियोजन आहे. या मोहिमेमध्ये २० पशुवैद्यक देखील सहभागी होणार आहेत. तसेच ज्या भटक्या श्वानांचे लसीकरण केले जाणार आहे, त्या श्वानांना विशिष्ट रंगाने चिन्हांकित केले जाणार आहे. दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणारी पहिल्या टप्प्यातील ही मोहीम प्रायोगिक असून त्यानंतर निरंतर पद्धतीने ही मोहीम राबविण्याचे नियोजन प्रस्तावित आहे, असेही पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.          


जसंवि/२५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज