आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिनानिमित्त राजावाडी रुग्णालयात विविध कार्यक्रम संपन्न - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिनानिमित्त राजावाडी रुग्णालयात विविध कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय औषध निर्माता (फार्मासिस्ट) दिवस निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.


जागतिक स्तरावर दरवर्षी २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक औषध निर्माता दिन म्हणून ओळखला जातो. औषध निर्माता हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा दुवा असतो. वैद्यकीय मंडळी, परिचारिका यांच्याप्रमाणेच रुग्ण सेवेमध्ये औषध निर्मात्यांची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) विद्या ठाकूर यांनी घाटकोपर स्थित महानगरपालिकेच्या राजावाडी उपनगरीय रुग्णालयात आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिवस निमित्ताने उपक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार, राजावाडी रुग्णालयाच्या औषधी निर्माण (फार्मसी) विभागाचे मुख्य औषध निर्माता श्री. अजय काकड व त्यांच्या सर्व सहकाऱयांनी विविध उपक्रम राबवले आहेत. 


याप्रसंगी झालेल्या मुख्य समारंभात मार्गदर्शन करताना प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) विद्या ठाकूर म्हणाल्या की, लोकांना निरोगी जीवनाचा सल्ला देण्यासह, रोगापासून बचाव करण्यासाठी औषधे योग्य प्रकारे खात्री करून घेवून उपचारांचे चांगले व्यवस्थापन व रुग्णांची जीवन शैली बदलण्यास प्रवृत्त करणे, हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये औषध निर्मात्यांची भूमिका सर्वाधिक मोलाची असते. फार्मासिस्ट्स हा नेहमी दिवसरात्र कठोर परिश्रम करून समाजाला निरोगी ठेवण्याचे काम करत असतो. यापैकी बहुतेक फार्मासिस्ट्स हे नेहमी पडद्यामागे शांतपणे काम करतात, यामुळेच त्यांच्या कठोर परिश्रम आणि समाजातील योगदान ओळखण्याची आवश्यकता आहे. बहुतेक लोक फार्मासिस्ट्सने पुरविलेल्या सेवांच्या व्यापकतेपासून अज्ञात आहेत आणि त्यांना फक्त औषधे वितरीत करणार्‍या व्यक्ती म्हणून ओळखले जाते. फार्मासिस्ट हा नेहमी त्याच्याकडे म्हणजेच औषधलयामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णाच्या औषधी, प्रमाण तसेच पद्धती सुनिश्चित करतात. योग्य औषध, योग्य मात्रा पुरविण्याचे काम फार्मासिस्ट करतात, त्यामुळे औषध निर्मात्यांना देखील त्यांचा योग्य सन्मान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.


मुख्य औषध निर्माता श्री. अजय काकड यावेळी म्हणाले की, रुग्णांनी औषधे घेताना काय काळजी घ्यावी,  कुठली औषधे घ्यावी अथवा कुठली घेऊ नयेत, कोणत्या वेळी कोणते औषध घ्यावे, जेवणाआधी की जेवणानंतर, थंड पाणी की कोमट पाणी की दुधासोबत औषधे घ्यावेत, अशा अनेक प्रकारच्या सल्ल्यांमुळे औषधांची परिणामकारकता वाढण्यास मदत होते. यामुळे औषध निर्माता हा रुग्णांचा विश्वास टिकविण्यासाठी किंबहुना आरोग्य व्यवस्थेवर रुग्णांचा विश्वास निर्माण करण्यामध्ये मोलाचे सहाय्य करत असतो, असे त्यांनी नमूद केले.


औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमधील औषध निर्माता कर्मचाऱयांनी एकत्र येत, रुग्णांना प्रोटीन पावडर विनामूल्य वितरण, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ७५ कर्मचाऱयांतर्फे रक्तदान, औषधी वनस्पती जसे आवळा, तुलसी, निलगिरी वृक्षारोपण, दैनंदिन कामकाज व जीवनातील ताणतणावावर माल करण्यासाठी योगा, आरोग्य तज्ञांकडून मार्गदर्शन, राजावाडी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात विविध जनजागृतीपर पोस्टर्स प्रदर्शन, एका वाक्यातून संदेश देणारी भित्तीपत्रके यासारखे उपक्रम उत्साहात साजरे केले. तसेच, औषधांचा नेमका परिणामकारक उपयोग कसा होतो या विषयावर राजावाडी रुग्णालयातील औषध निर्मात्या पूजा परदेशी व लिली मायकेल यांनी आकाशवाणीवर मुलाखत देवून श्रोत्यांना उत्तम माहिती  दिली.



जसंवि/ २५७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज