बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबईच्या पर्यावरण समृद्धी साठी अविरत झटणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचा गौरव
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पर्यावरण समृद्धीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आणि अविरतपणे झटणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविधस्तरीय पर्यावरण पूरक बाबींची दखल नुकतीच एका बहुप्रतिष्ठित पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ७०० पेक्षा अधिक उद्यानांची आणि लक्षावधी झाडांची शास्त्रशुद्ध काळजी नियमितपणे घेत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पर्यावरण समृद्धीस हातभार लावणाऱ्या महानगरपालिकेच्या उद्यान खात्याचा 'अर्थ केअर अवॉर्ड'ने सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मा. पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी हा पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याच्या वतीने स्वीकारला. पर्यावरण विषयक विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा गौरव या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने करण्यात येत असतो.
मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असणाऱ्या एन.सी.पी.ए. येथील 'टाटा थिएटर' येथे शुक्रवारी संध्याकाळी उशिरा संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याला 'अर्थ केअर अवॉर्ड" ने सन्मानित करण्यात आले. 'टोवर्ड्स क्लायमेट रिसिलिएंट अँड ग्रीन मुंबई' (Towards Climate Resilient and Green Mumbai)' या उद्यान खात्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला 'अर्बन सेंटर क्लायमेट चेंज मॅनेजमेंट' (Urban Centered Climate Change Management) या श्रेणी अंतर्गत गौरविण्यात आले आहे. 'अर्थ केअर अवॉर्ड्स' (ECAs) हा जेएसडब्ल्यु' आणि टाईम्स समूहाचा संयुक्त उपक्रम आहे.
'अर्थ केअर अवॉर्ड्स' हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. हवामान बदलाला प्रतिसाद म्हणून देशातील वैयक्तिक नेतृत्व, संस्था, कॉर्पोरेट्स तसेच राज्य नेतृत्वाच्या अनुकरणीय हवामान बदलांस अनुकूल पर्यावरणीय कार्यक्रमाला मान्यता आणि प्रोत्साहन देतो.
मुंबई शहराला असा प्रतिष्ठेचा सन्मान मिळणे, हा सर्व मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने मुंबई शहराला जगाची 'ट्री सिटी' म्हणून घोषित केले होते. आता 'अर्थकेअर अवॉर्ड'ने हवामान बदलला प्रतिरोधक हरित शहरासाठी मुंबई शहर करीत असलेल्या प्रयत्नांकरिता सन्मानित करण्यात आले आहेत.
या पुरस्कार करीता देशभरातून अर्ज प्राप्त होत असतात. यानुसार 'अर्थकेअर अवॉर्ड फाऊंडेशन'ने जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत हवामान बदलाला प्रतिसाद म्हणून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागवले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने मुंबई शहरातील विविध ठिकाणी हाती घेतलेल्या मियावाकी प्रकल्पांबद्दल आणि मुंबई शहरातील वृक्षसंपदा संगोपन कार्यक्रम इ. तपशील नमूद करून अर्ज सादर केला होता.
या पुरस्काराच्या निवड प्रक्रियेमध्ये मध्ये अर्जाची छाटणी प्रक्रिया, प्रत्यक्ष स्थळ पाहणी व प्रकल्पाचे सादरीकरण इत्यादींचा समावेश होता. विविध पातळींवर छाननी झाल्यानंतर व विविध फे-यांमधून उत्तीर्ण होऊन अंतिमत: पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आले.
या पुरस्काराच्या निवड समीतीचे अध्यक्ष आणि सी. एस. आय. आर. चे माजी संचालक व नामवंत शास्त्रज्ञ श्री. रघुनाथ माशेलकर असून त्यांच्या नेतृत्वातील तज्ज्ञ समितीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने यशस्वीरित्या राबविलेल्या "मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्प, विविध उद्याने,खेळाची मैदाने व मनोरंजन मैदाने इ. मधील नागरिकांना उपलब्ध केलेल्या सर्व सुविधा, CSR व नागरीकांच्या सहभागातुन पूर्ण केलेले प्रकल्प इ." बाबींची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्काराने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच नव्हे, तर सर्व मुंबईकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची पर्यावरण पूरक कामे ही योग्य दिशेने असल्याचे अधोरेखित केले असल्याचे नमूद करत उद्यान अधीक्षक श्री. परदेशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी - कर्मचारी आणि पुरस्कार निवड समितीचे आभार मानले आहेत.
जसंवि/ १२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा