मुंबई : शस्त्रविक्रीचा डाव मुंबई पोलिसांनी शनिवारी हाणून पाडला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-११ ने एकाला अटक केली. आरोपीला अधिक चौकशीसाठी बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
गोरेगावच्या भगतसिंग नगर-१ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या घरी बेकायदा शस्त्रे लपवून ठेवली आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाली. त्यांच्या गोपनीय सूत्रांनी या व्यक्तीच्या घराचा पत्ता दिल्यावर पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोरेगाव लींक रोड जवळील सागर वेल्फेअर सोसायटीमध्ये जाऊन छापा टाकला. तेथे त्यांना २० वर्षाचा तरुण सापडला. त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्यात ३ परदेशी बनावटीचे कट्टे आणि ९ जिवंत काडतुसे सापडली.
अटक केलेल्या आरोपीला बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने ही शस्त्रास्त्रे नेमकी कोणाकडून आणली आणि त्याची विक्री तो कुणाला करणार होता? तसेच त्याचे साथीदार कोण आहेत? याबाबत पोलीस अधिक तपास करत असून यात अजून काही लोकांना अटक होऊ शकते अशी माहिती वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा