मुंबई : १८ वर्षांखालील हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस महिनाभर शहरात 'ऑपरेशन मुस्कान' राबवणार आहेत. या ऑपरेशनदरम्यान हरवलेल्या मुलांचा शोध पोलीस घेणार आहेत. अभ्यासाचा कंटाळा, कौटुंबिक वाद आणि अन्य कारणास्तव लहान मुले घर सोडून निघून जातात.
हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविणे हे कठीण असते. कित्येकदा बेपत्ता मूल सापडल्यावर पालक पोलिसांना कळवतदेखील नाहीत. काही मुले ही घरातून पळून आल्यावर निवारा म्हणून रस्त्यावर राहतात. तेथे राहिल्यावर ते व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे घरचा पत्ता देखील सांगत नाहीत. अशावेळी मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस करावी लागते. बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान' ही मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण महिनाभर पोलीस शहरात ऑपरेशन उपक्रम राबवणार आहेत.
ऑपरेशन मुस्कान दरम्यान जास्तीत जास्त बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुलांना भिक्षा मागायला लावतात. अशा ठिकाणं पोलीस शोधून काढणार आहेत. तसेच काही रेल्वे स्थानक परिसरात मुले भिक्षा मागताना आढळून येतात. अशा रेल्वे स्थानकांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. जर १८ वर्षाखालील कोणी घरकाम करत असल्यास त्याची माहिती १०० किंवा १०९८ वर कळवण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा