प्रतिबंधित प्लास्टिक वापरणा-यांवर कडक कारवाई, ५ कोटी ३६ लाखांची दंड वसुली
प्रतिबंधित प्लास्टिक न वापरण्याचे नागरिकांना सातत्याने आवाहन
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करु नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येते. तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानुसार जून २०१८ ते जानेवारी २०२२ या सुमारे २० महिन्यांच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान १ लाख ७५ हजार ४२८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन यापोटी ५ कोटी ३६ लाख ८५ हजार इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अनुषंगाने अधिक चांगल्या पर्यावरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असलेल्या विविध स्तरिय कार्यवाहीचा भाग म्हणून ‘प्रतिबधित प्लास्टिक’ विरोधी कारवाई आता अधिक प्रभावी करण्यात येत आहे. तरी कृपया सर्व नागरिक, व्यापारी, फेरीवाले व सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करु नये. जेणेकरुन, महानगरपालिकेला रुपये ५ हजार ते रुपये २५ हजार पर्यंतची दंडात्मक कारवाई सारखी अप्रिय कारवाई टाळता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २३ मार्च २०१८ च्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिकपासून बनवल्या जाणा-या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.
प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.
(जसंवि/ ६२५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा