मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी भाषा गौरव आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन
विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव
मुंबई : सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली. मराठी भाषा गौरव वर्षभरच नव्हे तर आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रधान सचिव भूषण गगराणी यांचेसह साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते. राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यांच्या कर्तृत्वाचा थोडा तरी अंश आपल्यात आला पाहिजे. आपल्या साधू-संतांनी आपल्याला दिलेला वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाची मातृभाषा ही त्याच्या आईकडून त्याला मिळालेली सर्वोत्तम देणगी असते. तिचा गौरव करणे आवश्यक आहे. शिवसेनेची सुरुवात झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मराठी भाषिकांना सांगितले होते नौकऱ्या मागणारे होऊ नका नौकऱ्या देणारे व्हा. व्यवसाय करण्याचे आवाहन मराठी युवकांना त्यांनी केले होते. मराठी भाषा या पुढे वर्षानुवर्षे टिकली पाहिजे याची जबाबदारी आपल्यावर आहे. घरा-घरांतून मराठी बोलली गेली पाहिजे असे सांगून इतर भाषा शिकाव्यात मात्र मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गौरवदिन हा भव्य स्वरुपात व्हावा
यापुढचा गौरवदिन हा मोठ्या पटांगणात व्हावा तो संपूर्ण राज्यभर साजरा व्हावा. जगभर मराठी माणसं पसरलेली आहेत. या ठिकाणी मराठी कुटुंब एकत्र येतात आणि मराठी भाषा गौरव दिन एखाद्या सणासारखा साजरा करतात. आज पाच गावात पुस्तकाचे गाव तयार होते आहे या साठी अभिनंदन करून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी या सारख्या भाषेतील साहित्य ठेवले पाहिजे. जर आपल्या राज्यात कोणीतरी चरितार्थासाठी येत असेल तर त्याने इथे आपल्या भाषेत बोलले पाहिजे हा आग्रह केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा