मध्य रेल्वेमार्गावरील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या भायखळा स्थानकाचा येत्या नवीन वर्षात कायापालट होणार आहे. या स्थानकाला १८५७ चा लुक देण्यात येत आहे. येत्या २६ जानेवारी रोजी स्थानकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामध्ये स्थानकातील नक्षी, दरवाजे, खिडक्या, भिंतीचा समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली जाणार आहे.
भायखळा हे मेन लाईन वरील गर्दीचे स्थानक आहे. भायखळा स्थानकाच्या पश्चिमेकडे २६ कमानी आहेत. या कमानीवरील फुलांवर सुंदर आणि रेखीव असे नक्षीकाम केले आहे. हे नक्षीकाम पुन्हा जिवंत करण्यात येत आहे. तसेच स्थानकाच्या बाहेरील भिंती स्वच्छ करण्यात आल्या आहेत.
छतावरील जुनी कौले काढून त्याजागी साजेशी अशी कौले लावण्यात येणार आहेत. जुन्या तिकीट खिडकीच्या आतील भागातील दुरुस्तीचे काम सुरू आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दुरुस्ती करण्यात आली आहे.
देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांमध्ये भायखळा स्थानकाचा समावेश आहे. १८५३ साली या स्थानकाचे बांधणी लाकडाचा वापर करून केली. त्यानंतर १८५७ साली पुन्हा नव्याने बांधकाम केले तेच बांधकाम आजही पहावयास आपल्याला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा