नेरुळ रुग्णालयाच्या अचानक भेटीतून आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांची रुग्णालयीन सुविधांची पाहणी
-दादासाहेब येंधे :
सध्या माता बाल रुग्णालय म्हणून कार्यान्वित असणा-या नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारती या सर्वसाधारण रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने प्रशस्त स्वरुपात बांधण्यात आल्या असून त्याठिकाणी १ जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरु करण्याचे लक्ष्य महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नजरसमोर ठेवले आहे.
त्यादृष्टीने संबंधितांना यापूर्वीच दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याची पाहणी करण्यासाठी तसेच रुग्णालयाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ऐरोली व वाशी रुग्णालयांपाठोपाठ सेक्टर- १५ नेरुळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयास अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान सध्या सुरु असलेल्या आरोग्य सेवांची पहाणी करत असताना तेथे सुरू असलेल्या बाह्यरूग्ण सेवांमध्ये (O.P.D.) नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा तपासणी, त्वचाविकार, मानसोपचार, मेडिसीन या बाह्यरुग्ण सेवाही सुरु करण्याची गरज लक्षात घेऊन आयुक्तांनी 1 जानेवारीपर्यंत या बाह्यरुग्ण सेवाही सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुर्तता करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
ऐरोली प्रमाणेच नेरुळ रुग्णालयातही कोव्हीड पश्चात उपचारकेंद्र (Post COVID Clinic) सुरु असून त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्दी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या कोव्हीड बाधीत होणा-यांची संख्या कमी झाली असली तरी कोव्हीड बाधीत होऊन गेल्यानंतर वैद्यकीय सेवेची गरज असणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी महानगरपालिकेची उपचार सेवा रूग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता दर्शनी भागात फलक लावणे तसेच विविध माध्यमांचा उपयोग करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
याशिवाय नेरुळ रुग्णालयात डायलिसीस सेवा उपलब्ध असून तेथील ५ युनिट्सचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याचीही प्रसिध्दी व्यापक स्वरुपात करावी असे आयुक्तांनी सूचित केले.
या पाहणी दौ-यात फायर एक्स्टिंग्युशर या काही अग्निशमन उपकरणांच्या वापर कालावधीची मुदत उलटून गेल्याचे निदर्शनास आल्याने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत जबाबदारी निश्चित करण्याचे आदेशित केले.
रुग्णालयात पुरेशी स्वच्छता आहे मात्र त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याच्या व तेथे नागरिक मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रामुख्याने स्वच्छता गृहांच्या नियमित स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
बालरोग वॉर्डमध्ये दाखल होणारी रुग्णसंख्या सध्या कमी दिसत असून त्याबाबतही अधिक चांगल्या रुग्णसेवेवर भर देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूमच्या सद्यस्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत संबंधितांना समज देण्यात आली तसेच १५ दिवसात अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.
पूर्ण क्षमतेने स्टरलायझेशनच्या खरेदी करण्यात आलेल्या मोठ्या मशीन्स विनावापर पडून असल्याने त्यांचा वापर विनाविलंब सुरू करावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा