कोव्हीड प्रतिबंधात्मक नियम न पाळणा-यांकडून ऑक्टोबरमध्ये 20 दिवसात 10 लाखाहून अधिक दंड वसूली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

demo-image

कोव्हीड प्रतिबंधात्मक नियम न पाळणा-यांकडून ऑक्टोबरमध्ये 20 दिवसात 10 लाखाहून अधिक दंड वसूली

 कोव्हीड प्रतिबंधात्मक नियम न पाळणा-यांकडून ऑक्टोबरमध्ये 20 दिवसात 10 लाखाहून अधिक दंड वसूली

 

मागील आठवड्यापासून नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करीत बरे होऊन घरी परतणा-या नागरिकांची संख्या वाढलेली दिसत आहे. कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण ९१ टक्के झालेले असून ६.५२  टक्के कोरोनाबाधित व्यक्ती उपचार घेत आहेत. ही आकडेवारी काहीशी दिलासाजनक असली तरी सध्याचा उत्सव कालावधी पाहता सतर्क राहणे गरजेचे आहे.

कोरोनावर ठोस औषध सापडेपर्यंत मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर हीच कोरोनापासून बचावाची आयुधे आहेत. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा प्रत्येक नागरिकाने दैनंदिन व्यवहारात उपयोग करण्याविषयी विविध माध्यमांतून सतत जनजागृती केली जात आहे.

आता लॉकडाऊनमधील बंदी टप्प्याटप्प्याने खुली केली जात असताना तर सुरक्षेच्या या त्रिसूत्रीचा काटेकोर वापर करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे जे नागरिक बेजबाबदारपणे वागून स्वत:सह इतरांनाही कोरोना संसर्गाच्या धोक्यात आणताहेत अशा नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत अशा कारवाईतून ३५ लक्ष रक्कमेहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे.

नागरिकांना नियम पालनाची जाणीव व्हावी तसेच दंडात्मक रक्कमेतून समज मिळावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत सुरूवातीच्या काळात नियम मोडणा-या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात आले. अशा सार्वजनिक आरोग्य हिताला बांधा आणणा-या नागरिकांवरील कारवाईतून १ ते २० ऑक्टोबरपर्यंत २० दिवसांत १० लाख, ८०० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये -

        मास्क न लावणा-या ११७२ व्यक्तींकडून रू. ५ लक्ष ८६ हजार,

        सुरक्षित अंतर न पाळणा-या १४४४ व्यक्ती यांचेकडून रू. २ लक्ष ८८ हजार ८००,

        सुरक्षित अंतर न पाळणा-या ६३ व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. १ लक्ष २६ हजार,

        अशाप्रकारे एकूण १० लक्ष ८०० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

नवी मुंबईचा विचार करता याठिकाणी एपीएमसी मार्केट हा कोरोना प्रसाराच्या दृष्टीने जोखमीचा भाग आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाला कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे व्यापारी, गाळेधारक, विक्रेते, कामगार तसेच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून येणारे ग्राहक यांचेकडून कोटेकोर पालन केले जाईल याविषयी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याठिकाणीही महानगरपालिकेची विशेष दक्षता पथके कार्यरत असून त्यांचेमार्फत

        मास्क न लावणा-या १४२ व्यक्तींकडून रू. ७१ हजार,

        सुरक्षित अंतर न पाळणा-या २६९ व्यक्ती यांचेकडून रू. ५३ हजार ८००,

        सुरक्षित अंतर न पाळणा-या ४ व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. ८ हजार,

      अशाप्रकारे एकूण १ लक्ष ३२ हजार ८०० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

कोरोनावर विशिष्ट लस अथवा औषध उपलब्ध नसल्याने सध्या तरी सुरक्षित नियमांचे पालन हाच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे कोणावर मुद्दाम कारवाई नाही मात्र जे आरोग्याविषयी बेफिकिरी दाखवतील आणि स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात आणतील अशा नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी एपीएमसी मार्केटच्या पाहणी दौ-याच्या वेळी स्पष्ट केले होते.

आपल्याला दंडात्मक रक्कम भरावी लागू नये याकरिता तरी नागरिकांनी आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे ही यामागील भूमिका आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तीकडून रू. १ हजार, मास्क न लावणा-या व्यक्तीकडून रू. ५००/-, सुरक्षित अंतर न पाळणा-या व्यक्तीकडून रू. २००/- व सुरक्षित अंतराचे नियम मोडणा-या व्यापारी/दुकानदार यांचेकडून रू. २ हजार अशाप्रकारे दंड वसूल केला जात आहे. यानुसार - २९ एप्रिलपासून आत्तापर्यंत ४५ लक्ष रक्कमेहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे.


'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने खुले केल्यानंतर कोव्हीडच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे हीच प्रतिबंधात्मक ढाल आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक गांभीर्याने सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी  महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये आणि आपल्यामुळे कुटुंबियांना व इतरांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी  असे आवाहन केले आहे. 


1

2

3












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *