नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा मुंबई महानगरात २८ एप्रिलपासून प्रारंभ - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा मुंबई महानगरात २८ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई, दि. २८ : ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक लस घेता येईल.


बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र या प्रमाणे २४ लसीकरण केंद्रांवर, नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीद्वारे कोविड - १९ प्रतिबंधक लसीकरण आज शुक्रवार, दिनांक २८ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात आले आहे. ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना,  त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) श्री. संजय कु-हाडे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरात कोविड संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महानगरपालिका आरोग्य प्रशासन सजगतेने कार्यरत आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर दिनांक १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) दिनांक १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहेत. काल अखेर (दिनांक २६ एप्रिल २०२३) महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची एकूण संख्‍या २ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ इतकी आहे. यामध्‍ये पहिली मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १ कोटी ८ लाख ९३ हजार ६७९ आहे. तर, दुसरी मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या ९८ लाख १५ हजार ०२० इतकी आहे. प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १४ लाख ८८ हजार २९६ आहे. 


महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या शुक्रवार, दिनांक २८ एप्रिल २०२३ पासून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) ही लस ६० वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल.  कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्‍याचे देखील स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.


मुंबई महानगर क्षेत्रातील २४ ठिकाणी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पाट नोंदणीद्वारे देण्यात येईल. २४ विभागातील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर खात्यावर दररोज प्रकाशित करण्यात येतील. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  

(जसंवि/०५२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज