आमदार सुनील राणे यांनी आयोजित केलेल्या दांडियातील बनावट प्रवेशिका बनविणाऱ्या टोळीस अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता आणखी एक टोळी जेरबंद केली आहे. फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाचे पास देतो, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांना एम. एच. बौ. कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त बोरिवलीच्या चिकूवाडी येथे दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुनी पाठक यांचाही कार्यक्रम यामध्ये ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. कांदिवली येथे राहणारे व्यावसायिक निहार मोदी यांना कुटुंबीय तसेच मित्र-मैत्रिणींसोबत या दांडियामध्ये सहभागी व्हायचे असल्याने ते प्रवेशिका मिळविण्याच्या प्रयत्नात होते.
याचवेळी त्यांना विशाल शहा असे नाव सांगणाऱ्या एक तरुण आणि त्याचा साथीदार भेटला. साडेचार हजार रुपये एका पासची किंमत ३३०० रुपयांना मिळवून देतो, असे निहार यांना सांगण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निहार यांनी १५६ पास मागवले, ५ लाख १४ हजार रुपये निहार यांनी न्यू लिंक रोड येथे जाऊन विशालच्या सांगण्यावरून रिक्षातून आलेल्यांना दिले. रिक्षातील तरुणांनी एका इमारतीचे नाव सांगून तेथून प्रवेशिका घेण्यास निहार यांना सांगितले. निहार यांनी शोध घेतला असता अशी इमारतच नसल्याचे समजले. त्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली.
वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या पथकाने ७० ते ८० सीसीटीव्हीची चौकशी केली. त्याचबरोबर इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अश्विन सुर्वे, श्रीपाल बागडिया, सुशील तिर्लोटकर, संतोष गुबरे यांना अटक केली. अश्विन हा एका हॉटेलचा मालक असून श्रीपाल इलेक्ट्रिशअन, सुशील चालक, संतोष नोकरी करीत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा