बहिणीच्या साखरपुड्यात दंगा करणाऱ्या चुलत भावाच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी; तीन जणांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

बहिणीच्या साखरपुड्यात दंगा करणाऱ्या चुलत भावाच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी; तीन जणांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : बहिणीच्या साखरपुड्यात दारू पिऊन दंगा घालणाऱ्या चुलत भावाची ३ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग येथे घडली होती. कांजूरमार्ग पोलिसांनी मुख्य आरोपीला तर गुन्हे शाखेने इतर २ जणांना अटक केली आहे. या घटनेतील मृत व्यक्ती आणि आरोपी हे अंधेरी पूर्व चकाला येथे राहणारे आहेत. विजय सारवान, रोहित चंडालिया, (२९) सागर पिवाळ (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून विजय हा मृत इसमाचा चुलत भाऊ असून इतर दोघे आरोपी सुपारीबाज आरोपी आहेत. सागर आणि रोहित हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.


कांजूरमार्ग पूर्व द्रुतगती महामार्गावरील मेट्रो कारशेड येथे रविवारी कांजूरमार्ग पोलीस ठाण्याला एक पुरुषाचा मृतदेह मिळाला होता. या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत इसमासोबत दोन संशयित इसम आढळून आले होते.


कांजूरमार्ग पोलिसांना मृतदेहाकडे सापडलेल्या आधारकार्ड वरून मृत इसमाची ओळख पटविण्यात आली. मृत इसमाचे नाव राजेश मनबिरसिंग सारवान (४२) असे असून तो अंधेरी पूर्व चकाला येथे वास्तव्यास होता. राजेश सारवान हा महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी करीत होता. मात्र दारूच्या अतिव्यसनामुळे कामावर जात नसल्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. अंधेरी चकाला येथे राहणाऱ्या मृत इसम राजेश सारावान याचे सर्व नातलग चकाला येथेच वास्तव्यास आहेत. राजेश सारवान हा दारू पिऊन नातलगांना शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असे. त्याच्या या कृत्याला नातलग कंटाळले होते. शुक्रवारी चुलत भाऊ विजय याच्या मुलीच्या साखरपुड्यात मृत राजेश सारवानने विवस्त्र होऊन राडा केला होता. त्याचा राग विजयला आला होता, राजेशच्या या कृत्यामुळे अखेर विजयने त्याला संपविण्याचा कट आखला. विजयने विलेपार्ले येथे राहणाऱ्या सागर आणि रोहित या सुपारीबाज आरोपींना राजेशच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी ५० हजार आगाऊ रक्कम दिली होती. बाकीची शिल्लक रक्कम काम झाल्यानंतर देण्यात येणार होती. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजेशला दारूचे भयंकर व्यसन होते, दारूच्या नशेपायी त्याला मुंबई महानगर पालिकेची नोकरी गेली होती. राजेश हा दारूच्या नशेत नातेवाईक आणि कुटूंबाना त्रास देत होता. शुक्रवारी विजय सारावान याच्या बहिणीचा साखरपुडा होता. राजेश याने साखरपुड्यात दारू पिऊन धिंगाणा घातला होता. त्याच्या या कृत्यामुळे विजयला मनस्ताप सहन करावा लागला होता. अखेर विजयने त्याला संपविण्याचा प्लॅन बनविला.


शनिवारी कॉन्ट्रॅक्ट किलर्स सागर आणि रोहित यांनी राजेशला भरपूर दारू पाजून त्याला कांजूरमार्ग पूर्व मेट्रो कारशेड येथे घेऊन गेले. त्याला झुडुपात आणून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करून तेथून पळ काढला होता. कांजूरमार्ग पोलिसांनी चुलत भाऊ विजय सारवान याला चौकशीसाठी ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष-७ आणि ८ च्या पथकाने कॉन्ट्रॅक्ट किलर्स रोहित आणि सागर या दोघांना विलेपार्ले परिसरातून अटक केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज