धावत्या रिक्षामध्ये गैरकृत्य करणाऱ्यास अटक
मुंबई, दि. २४ : रिक्षाने प्रवास करणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीकडे पाहून चालकाची नियत फिरली होती. एकटी असल्याचा गैरफायदा घेत रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. मुलीने विरोध करताच 'मुझे अच्छा लगता है' असे उलट बोलून त्याने तेथून पळ काढला होता. मात्र, या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेने समांतर तपास करून त्या विकृत रिक्षा चालकास अटक केली आहे.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक १३ वर्षीय मुलगी खाजगी शिकवणी संपल्यानंतर पवईच्या हिरानंदानी येथून मोरारजी नगरला जाण्यासाठी निघाली होती. तिने एक रिक्षा केली होती. रिक्षा काही अंतरावर गेली असता चालकाची नियत फिरली. त्याने त्याचा डावा हात मागे घेऊन मुलीच्या मांडीवरून दोन ते तीन वेळेस फिरवला. मुलीने त्याला विरोध केला परंतु चालकाने तिचे काही ऐकून न घेता 'मुझे अच्छा लगता है' असे तो उद्धटपणे तिला बोलला.
मुलीच्या पालकांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेच विनयभंग व पोक्सोचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१० चे प्रभारी निरीक्षक दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली गणेश तोडकर तसेच जगदीश धारगळकर, संतोष धनवटे, अमित जगताप, शिंदे, डफळे या पथकाने देखील तात्काळ समांतर तपास सुरू करून घाटकोपर पश्चिमेकडील महिंद्रा पार्क इथून रिक्षा व चालकास बेड्या ठोकल्या. बनश्याम सोनी (वय,५५) असे त्या रिक्षाचालकाचे नाव असून तो दिवा येथे राहतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा