जोगेश्वरीतील घातक शस्त्रसाठा जप्त
मुंबई, दि. १२ : जोगेश्वरीतील एका महिलेला धमकी देत विनयभंगासह लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीसह दोघांना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली आहे. अरबाज झाकीर हुसेन आणि तबिश झाकीर हुसेन अशी त्यांची नावे असून दोघेही उत्तर प्रदेशच्या बदायू जोगीपूरचे रहिवाशी आहेत.
पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल, वीस जिवंत काडतुसे, तीन बटन चाकू, एक कट्टा, काट्याची तीन जिवंत काडतुसे जप्त केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी बोलताना सांगितले. दोघांनाही किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरी परिसरात काहीजण घातक शस्त्रांसह दरोड्यांसाठी येणार असल्याची माहिती वरळीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने अंधेरीतील न्यू लिंक रोड, डी. एन. नगरच्या बॉम्बे वायएमसीए इमारती समोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी सायंकाळी तिथे दोन तरुण आले होते. सचिन पुराणिक, दीपक पवार, उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, स्नेहल पाटील, काकडे व अन्य पोलीस पथकाने या दोघांना मोठया शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.

Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा