आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १ मे, २०२३

demo-image

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

बसस्थानकेही होणार  स्वच्छ, सुंदर

एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई, दि १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.   

%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3%201

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.


स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा

एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.

एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी

आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली आहे याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.


आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.

यावेळी बोलतांना सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले.

यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी ... एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.

या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

1451

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *