मुंबई, दि. ८ : यंदा मुंबईभर धुलीवंदनाचा उत्साह चांगला दिसून आला. कोरोना सावट पूर्णपणे दूर झाल्याने जागोजागी मुंबईकर रंग खेळताना दिसत होते. सोसायट्यांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा रंगोत्सव अधिक प्रमाणात साजरा करताना दिसला. होळीचा दुसरा दिवस धुलीवंदन किंवा धुळवड म्हणून साजरा केला जातो. त्यातच पहाटेच्या पावसाचा शिडकाव्याने तर निसर्गानेही या उत्सवात सहभागी झाल्याची जाणीव मुंबईकरांना करून दिली.
जवळपास तीन वर्षांनी हा सण उत्साहाने साजरा करता येत असल्याने सोसायटीमध्ये रंग उडवण्यासाठी सगळे एकत्र आल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. बहुतांश सोसायट्यांचे आवार सकाळी दहापासूनच रंग खेळणाऱ्यांनी भरू लागले होते. सकाळी १० ते १ दरम्यान हा उत्साह शिगेला पोहोचला होता. अनेक सोसायटीमध्ये रंग खेळणे, गाणी, डीजे व दुपारचे जेवण असा बेत आखलेला होता. रंग खेळण्यासाठी जवळपास अनेक संस्थांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी देखील दिली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा