Ticker

6/recent/ticker-posts

‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग करीत असलेले कार्य कौतुकास्पद - सह आयुक्त श्री. अजित कुंभार


चित्रकला स्पर्धेत तब्बल ७७,४५३ विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी हे स्पर्धेच्या युगात कुठेही कमी नसून अभ्यासाबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि हे कार्य बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग अतिशय उत्तमरित्या करीत असल्याचे गौरवोद्गार सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार यांनी काढले. ते आज मान. महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२२-२३’ चा पारितोषिक वितरण समारंभात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. 


महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज परळ परिसरातील दामोदर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या पारितोषिक वितरण समारंभाला सह आयुक्त श्री. अजित कुंभार यांच्या समवेत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजू तडवी, स्पर्धेच्या परीक्षक व सहाय्यक कला निरिक्षक महाराष्ट्र राज्य श्रीमती आरती श्रावस्ती, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) श्रीमती सुजाता खरे व इतर अधिकारी यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक वर्ग आणि संबंधित शिक्षकवृंदही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 


याबाबत अधिक माहिती देताना शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कला विषयक विविध उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमांच्या शृंखलेत ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी करण्यात येते. यानुसार 'महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा' दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तर, ३१ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धेचा निकाल एका विशेष पत्रकार परिषदेदरम्यान घोषित करण्यात आला होता.

 

सदर निकालानुसार आकर्षक, बोलकी व अर्थवाही चित्रे रेखाटणा-या ५२ परितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यानुसार अनुक्रमे कु. अनिकेत मंडल, कु. सोनिया दोलूई, कु. श्रावणी सत्यवान साटेलकर व कु. सानिका सदाशिव पाटील, स्वरा एन. गुरव, हर्ष संदीप चव्हाण, सई धनंजय कदम, सिद्रा फरहान मोमीन, शौर्या मानकर, रागिणी चंद्रमोहन जैसवार आणि तनिष्का आर. मुणगेकर यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी (शाळा) श्री. किसन पावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कला विभाग प्राचार्य श्री. दिनकर पवार यांनी केले. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या स्तरावर विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना विभाग स्तरावरील कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात येणार आहे, अशीही माहिती शिक्षण विभागाद्वारे कळविण्यात आली आहे.  

 

जसंवि/४६२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या