महानगरपालिकेच्या डिजीटल कामकाजात सर्वसमावेशक नवीन ई-मेल प्रणाली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

demo-image

महानगरपालिकेच्या डिजीटल कामकाजात सर्वसमावेशक नवीन ई-मेल प्रणाली

जुन्या ई-मेल प्रणालीतून मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ या ई-मेल प्रणालीमध्ये स्थलांतर 

महानगरपालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱयांना एकाचवेळी संगणक, भ्रमणध्वनी अशा ५ संयंत्रांवर ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरसिंग यासह आधुनिक वैशिष्ट्यांचा वापर करणे शक्य

संगणकीय सादरीकरण, कागदपत्रांची देवाण-घेवाण, सर्वेक्षण आणि इतरही अनेक सुविधांचा नवीन प्रणालीत समावेश   


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात डिजीटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करुन वेगवान, सुलभ आणि कार्यक्षम नागरी सेवा मुंबईकरांना देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. माहिती तंत्रज्ञान खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा ऑनलाईन केल्यानंतर नुकतीच व्हॉट्सअप चॅटबॉट सुविधादेखील सुरु झाली आहे. त्यापाठोपाठ आता महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी  मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ ही नवीन आणि सर्वसमावेशक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ई-मेल प्रणाली आज (दिनांक १४ फेब्रुवारी २०२२) पासून सुरु करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रचलित जुन्या ई-मेल प्रणालीतून या नवीन ई-मेल प्रणालीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात कोणत्याही संस्थेत कामकाजामध्ये व संवादासाठी देखील ई-मेलचा वापर सर्वाधिक केला जातो. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ई-मेल प्रणाली उपलब्ध असल्या तरी आपल्या गरजानुरुप सर्वोत्कृष्ट प्रणाली स्वीकारणे आवश्यक असते. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाची व्यापकता लक्षात घेता तसेच सर्व अधिकारी – कर्मचाऱयांना दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाने व संचालक (माहिती तंत्रज्ञान) श्री. शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली माहिती तंत्रज्ञान खात्याने नवीन ई-मेल प्रणाली स्थापन करण्याची कार्यवाही केली आहे.   


मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ या प्रणालीमध्ये आऊटलूक, टीम्स, यामर, शेअर पॉइंट, वन ड्राईव्ह, फॉर्म्स, पॉवरऍप, पॉवर ऑटोमेट इत्यादी वेगवेगळे ऍप्लीकेशनचा समूह वापराकरिता उपलब्ध झाला आहे. परिणामी, सर्व अधिकारी – कर्मचाऱयांना ई-मेलच्या पलीकडे जाऊन कॅलेंडर, व्हिडिओ कॉन्फरसिंग, समूह चर्चा, संगणकीय सादरीकरण, सर्वेक्षण, कागदपत्रांची देवाण-घेवाण यासारखे अनेक पर्याय एकाच प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहेत. 


मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ ही प्रणाली सर्व अधिकारी आणि कर्मचाऱयांना एकाचवेळी भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, टॅबलेट अशा प्रकारच्या ५ साधनांवर उपयोगात आणता येणार आहे. तर ई-मेलसाठी प्रत्येकी १ टीबी इतकी साठवण क्षमता उपलब्ध होणार आहे. दैनंदिन कामकाजाची पूर्तता करताना व्हिडिओ कॉन्फरसिंग सुविधेचा वापर करुन एकमेकांशी व नागरिकांशी संवाद साधणे, वेगवेगळ्या सर्वेक्षणातून माहिती संकलित करणे तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाजाचे व्यवस्थापन करणे अशा अनेक बाबी यातून शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ ही प्रणाली विश्वासार्ह, प्रभावी, सुरक्षित व एकूणच उत्पादनशील आहे. ही प्रणाली प्रत्यक्ष वापरात चांगला परिणाम देणारी आहे. 


महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याने जुन्या ई-मेल प्रणालीतून या नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित होण्याची कार्यवाही पूर्ण केली असून आजपासून त्याचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱयांना ही नवीन प्रणाली उपयोगात आणणे सुलभ व्हावे, यासाठी दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षणाची सोयदेखील मायक्रोसॉफ्ट टीम्स या ऍप्लीकेशनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व संबंधितांना अधिकारी आणि कर्मचाऱयांना माहिती तंत्रज्ञान खात्याकडून लघू संदेशाद्वारे (एसएमएस) आयडी आणि पासवर्ड विषयक माहिती पाठविण्यात आली आहे.  

  

काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेची सॅप संगणकीय प्रणाली ही सॅप हाना या नवीन व अद्ययावत संगणकीय प्रणालीमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही माहिती तंत्रज्ञान खात्याने पूर्ण केली. त्यानंतर मुंबईकर नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबॉट ही सुविधा सुरु केली. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला तळहातातल्या मोबाईलमधून थेट नागरी सुविधांची माहिती व जोडणी उपलब्ध झाली आहे. पहिल्या ४ दिवसातच तब्बल १९ लाख संदेशांची देवाण-घेवाण व्हॉट्सअप चॅटबॉटमधून झाली होती. जवळपास ९३ हजार नागरिकांनी त्याचा उपयोग केला होता. 


या सर्व वाटचालीनंतर आता महानगरपालिकेच्या अधिकारी – कर्मचाऱयांसाठी एकच आणि आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश असणारी सर्वसमावेशक ई-मेल प्रणाली उपलब्ध करुन दिल्याने दैनंदिन कामकाजात सुलभता येणार आहे.  









(जसंवि/५६७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *