बृहन्मुंबई महापालिकेच्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

demo-image

बृहन्मुंबई महापालिकेच्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश

'व्हिजन २०३०अंतर्गत स्वच्छ मुंबईसाठी ऑनलाईन सर्वेक्षणाचा प्रारंभ
पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वाहनांच्या समावेशासह सर्वेक्षण प्रारंभ

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील पर्यावरण पूरक बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा,” असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. याच कार्यक्रमा दरम्यान व्हिजन - २०३०अंतर्गत स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांच्या भावना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ऑनलाईन सर्वेक्षणाचा प्रारंभ देखील पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देखील नागरिकांनी सहभाग नोंदवावा व आपली मते आवर्जून मांडावीत, असेही आवाहन या निमित्ताने श्री. ठाकरे यांनी केले आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष श्री. सदानंद परब, शिक्षण समितीच्या अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. आबासाहेब जऱ्हाड, सचिव श्री. अशोक शिनगारे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे, उपआयुक्त (पर्यावरण) श्री. सुनील गोडसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) श्री. अशोक यमगर आणि संबंधीत मान्यवर उपस्थित होते.
 
बृहन्मुंबई मनपाच्या ताफ्यात समावेश झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांबाबत
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असणा-या वाहनांच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल यासारख्या खनिज तेलावर चालणा-या वाहनांसह सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक वाहनांचाही समावेश आहे. याच ताफ्यामध्ये आजपासून ५ इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश करण्यात आला आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लसव्हेहिकल असे मॉडेल नाम असणा-या सदर पाचही कार या केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या  कंपनीकडून ड्राय-लीजपद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. ही वाहने ड्राय-लीजपद्धतीने सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली असल्यामुळे सदर वाहनांसाठी दरमहा रुपये २७ हजार इतका खर्च असणार असून यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. सदर वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत नसल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.
 
'व्हिजन - २०३०अंतर्गत स्वच्छ मुंबई विषयक सर्वेक्षण
 
मुंबई शहरात दररोज सुमारे ६५०० मेट्रिक टन घन कचरा निर्माण होतो. या कच-यामध्ये सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा आणि निष्क्रिय कचरा यांचा समावेश आहे. घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६नुसार कचरा निर्मिती करणा-यांसह सर्व भागधारकांची कर्तव्ये परिभाषित करते. या नियमांची योग्य अंमलबजावणी केल्यास कच-यामध्ये घट, कच-यावर स्रोताच्या ठिकाणी प्रक्रिया करणे इ. मार्गाने स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणा होऊ शकते.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेने घन कचरा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी व्हिजन २०३०हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई महापालिका आपल्या २४ प्रशासकीय विभागांच्या विविध सामाजिक-आर्थिक रचनेला समजावून घेऊन, शहराला समग्र आणि शाश्वत स्वरुपाच्या कचरा व्यवस्थापनाकडे नेण्यासाठी कृती आराखडा (Action Plan) तयार करण्याची कार्यवाही करीत आहे. या अंतर्गत स्रोताच्या ठिकाणी आणि प्रभागातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे, जेणेकरून क्षेपण भूमीवर शून्य कचरा लक्ष्यित करता येईल.
 
सर्व समावेशक दृष्टिकोनातून व्हिजन २०३०तयार करणे हे मुंबई महापालिकेने सुनिश्चित केलेले लक्ष्य आहे. स्वच्छ मुंबईविषयक नागरिकांच्या भावना व मते जाणून घेण्यासाठी आजपासून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील गरजांच्या दृष्टीकोनातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन आणि भविष्यात निर्माण होऊ शकणा-या संभाव्य समस्यांवर मात करण्यासह मुंबई महापालिका आपल्या साधनांचा व उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि व्हिजन २०३०अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहभागात्मक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यास मदत करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
 
वरीलनुसार ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी “ https://mcgm-citizen-survey.cloudstrats.com  ” या संकेतस्थळावरील प्रश्नांची उत्तरे देऊन सदर सर्वेक्षणामध्ये सहभागी  व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

PRO_6920
















(जसंवि / ३०२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *