मुंबई, दादासाहेब येंधे : चांगल्या कमिशनचे आमिष दाखवून एका ठगाने भायखळ्यातील तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भायखळ्यात राहत असलेले वीरेंद्र (३५) हे त्यांच्या वडिलांच्या कोळसा बंदर येथील कारखान्यात नोकरी करतात. १०ऑगस्टच्या रात्री त्यांना यातील आरोपीने आपले नाव ललिता शर्मा सांगून शॉप नाऊ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. कंपनी ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना विविध वस्तू विकत घेण्यास सांगून या वस्तू बाजारात विकल्यास चांगले कमिशन देत असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात मालाची ऑर्डर खरेदी केल्यास १० टक्के, दुसऱ्या टप्प्यात १५ टक्के कमिशन असे चार टप्पे आहेत. तसेच ही कंपनी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांचे असल्याचे सांगून वीरेंद्रला त्याने आपल्या जाळ्यात ओढले. सांगितल्याप्रमाणे वीरेंद्रला पहिल्या दोन टप्प्यातील कमिशन मिळाले. त्यानंतर मात्र वीरेंद्रने खरेदी केलेल्या ०२ लाख ०२ हजार ५०० रुपयांच्या पाच ऑर्डरचे कमिशन मिळाले नाही. कमिशन न मिळाल्याने वीरेंद्रने कंपनीने दिलेला ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर वर कॉल केला असता तो नंबर मध्यप्रदेश मधील शेतकऱ्याचा असल्याचे उघड झाले. अखेर वीरेंद्र याने ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपनीच्या कस्टमर केअरला विचारणा केली असता त्यांनीही शॉप नाऊ नावाच्या कोणत्याही कंपनीशी आपले टायअप नसल्याचे सांगितले. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने वीरेंद्रने आग्रीपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा